परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
वर्ष २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे निवडणूक खर्च सादर न केल्या प्रकरणी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतचे सरपंच यांच्यासह ५ ग्रामपंचायत सदस्य यांना औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर २०१७ झाली होती. या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतच्या सरपंच आणि इतर उमेवारांनी निवडणूक खर्च आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार करण्यात आला नसल्याने कोल्हावाडीचे माजी सरपंच दिगंबर भिसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
परभणी जिल्हाधिकारी यांनी तक्रारदाराचा अर्ज फेटाळाल्यानंतर या प्रकरणी औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले होते. सरपंच विठ्ठल भिसे आणि इतर चार सदस्यांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बँक खाते उघडून केला नाही तसेच निवडणूक निकलानंतर बँकेत खाते उघडून निवडणुकीसाठी खाते उघडण्यात आल्याचे कागदपत्रे अपिलात सादर करण्यात आली होती.
विभागीय आयुक्तांनी या प्रकरणात सुनावणी करत सरपंच विठ्ठल ज्ञानोबा भिसे, उपसरपंच अश्विनी लक्ष्मण भिसे, वंदना मधुकर भिसे, कांताबाई आश्रोबा गायकवाड, सलीकराम हरिबुवा गिरी, या पाच सदस्यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने विभागीय उपआयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी १ जानेवारी रोजी आदेश काढले आहेत. दरम्यान निवडणूक खर्च प्रकरणात सरपंच आणि सदस्य यांना अपात्र ठरवल्याची परभणी जिल्ह्यातील ही पहिली घटना असावी.