औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या नांदेड- मनमाड दुहेरीकरण आणि विद्युतीकरण तसेच औरंगाबाद- मनमाड इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याच्या मनमाडकर यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आगामी काळात दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन औरंगाबाद रेल्वे स्थानकाजवळील चिकलठाणा येथे प्रवासी रेल्वेगाड्यांच्या मेन्टेनन्स संबंधित आधुनिक यंत्रणा उभारणीसाठी विचाराधीन आहे. ही यंत्रणा उभी राहिल्यास उपरोक्त इंटरसिटी एक्सप्रेस साठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील सिकंदराबाद क्षेत्राची 73वी क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीची महत्त्वपूर्ण बैठक महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे मुख्य प्रतिनिधी म्हणून नितीन पांडे यांनी सहभाग घेत मनमाड परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या महत्त्वपूर्ण मागण्या आणि समस्या मांडल्या. नांदेड- मनमाड या दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्य लोहमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरी करण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
औरंगाबाद- नाशिक मार्गावरील रेल्वे प्रवाशांची संख्या गत काही वर्षांपासून अत्यंत वेगाने वाढत आहे. या संख्येच्या तुलनेने या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्या अतिशय अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी गैरसोय होत असते. ही गैरसोय दूर करण्यासाठी औरंगाबाद- मनमाड इंटरसिटी एक्सप्रेस त्वरित सुरू करावी अशी मागणी नितीन पांडे यांनी केली. या मागण्यांना रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.