व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद मनसेचे नव्या नेतृत्वात पहिलेच आंदोलन; कोरोना नियमांना मात्र हरताळ

औरंगाबाद – शहरातील अनेक भागातील नागरिक गुंठेवारीच्या मालमत्तांमध्ये राहतात. त्यांच्या करात मनपाने अन्यायकारकवाढ केली आहे. मुंबईत 500 चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात माफी देण्यात आली, मग औरंगाबादकरांवर अन्याय का, असा सवाल करत औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आज मानपासमोर जोरदार आंदोलन केले. मागील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये येऊन गेले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले. आता नव्या नेतृत्वात औरंगाबाद मनसेचे हे पहिलेच आंदोलन आहे.

सोमवारी औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी सुभाष देसाई यांनी हळू हळू राज्यात सर्वत्रच 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ होईल, असे सांगितले. मात्र पालकमंत्र्यांची केवळ तोंडी पोकळ आश्वासनं आम्हाला नको आहेत. ठोस निर्णय घ्यावा लागेल, असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे.

 कोरोना नियमांना हरताळ – यावेळी आंदोलन करताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून आले. एकीकडे सर्वसामान्यांनी नियम न पाळल्यास दंड आकारण्याचे आदेश मनपा प्रशासकांनी दिले आहेत. त्याच मनपाच्या समोर आज मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोरोना नियम धाब्यावर बसवत आंदोलन केले. आता यावर प्रशासन किती दंड आकारणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.