औरंगाबाद | मुंबई-नागपूर मार्गे औरंगाबाद अशी हाई स्पीड रेल्वे सुरू केली जाणार आहे. यामुळे अवघ्या दीड तासात औरंगाबादहुन मुंबई गाठता येणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्ग अंतर्गतच हा नवा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा काही प्रमाणात भूसंपादन केले जाणार असल्याने बुधवारी एमजीएमच्या सभागृहात रेल्वे व जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. या मोबदल्यात सह प्रकल्पाच्या पर्यावरण व सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
या बैठकीत प्रकल्पाचे अधिकारी अनिल शर्मा, राहुल रंजन निवासी जिल्हाधिकारी आनंद गव्हाणे यांच्या उपस्थितीत रुक्मिणी सभागृहात बैठक झाली. केंद्र सरकार समृद्धी महामार्गलगत मुंबई नागपूर मार्गे औरंगाबाद अशी हाई स्पीड रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत आहे त्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड प्राथमिक सर्वेक्षण करून प्रस्तावही तयार केला आहे.
या बैठकीमध्ये माहिती देताना डॉक्टर गव्हाणे म्हणाले की या रेल्वेमार्गासाठी 17 मीटर रुंद जागेची आवश्यकता आहे. बहुतांश ठिकाणी समृद्धी मार्ग करिता संपादित केलेल्या जमिनीचा उपयोग केला जाणार आहे. या रेल्वेची गती ताशी 350 किलोमीटर राहणार आहे त्यामुळे या रेल्वेमार्गात वळण कमी ठेवले जाणार आहेत. मात्र समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे वळण असल्याने त्याठिकाणी रेल्वेचा मार्ग सरळ ठेवण्यासाठी नव्याने भूसंपादन केले जाणार आहे. याकरिता शर्मा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.