औरंगाबाद- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ शक्य !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – देशात येत्या तीन वर्षांत 400 नव्या ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू होणार आहेत. यात औरंगाबाद ते मुंबई ही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होण्याची दाट शक्यता आहे. कारण मनमाड ते औरंगाबाद रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण या मार्चअखेर पूर्ण होईल. त्यामुळे औरंगाबादला नवीन फास्ट वंदे भारत रेल्वे मिळेल, असा अंदाज मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी वर्तविला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत. यात मराठवाड्याला काय मिळेल, याविषयी अद्याप स्पष्टता नसली तरी काही तरतुदींवरून अंदाज बांधला जाऊ शकतो, असे बोरकर यांनी नमूद केले. त्यानुसार स्थानिक उद्योग व्यवसायासाठी ‘एक स्टेशन एक उत्पादन’ योजना होणार आहे. या योजनेचा मराठवाडाभर फायदा होईल. कारण आपल्या रेल्वे मार्गावर शेतीमालाचे तसेच औद्योगिक उत्पादन असणारे बरीच स्थानके आहेत. तीन वर्षांत देशात १०० नवे कार्गो टर्मिनल्स होणार आहेत. यामध्ये औरंगाबाद येथे डीएमआयसी प्रोजेक्ट अंतर्गत व ऑरिक सिटी शेंद्रा बिडकीन येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे औरंगाबाद येथे कार्गो टर्मिनल्स होईल; तसेच आता अंकई ते औरंगाबाद दुहेरीकरण मंजूर झाल्यामुळे येथून मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होईल.

शिवाय 60 किलोमीटरचे आठ ‘रोपवे’ होणार असून यात देवगिरी किल्ला येथील रोपवेचा नक्कीच समावेश झाला असेलच, कारण यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे प्रयत्नशील आहेत, असेही बोरकर यांनी सांगितले. औरंगाबाद येथे मेट्रोची चाचपणी सुरू झाली असून याकरिता डॉ. भागवत कराड यांनी बैठकही घेतली आहे, त्यामुळे वाळूज ते शेंद्रा हा प्रकल्प मंजूर होण्याची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद येथे रेल्वेस्टेशन ते जवाहर कॉलनी, सिडको, टीव्ही सेंटर, बसस्थानक परत स्टेशन या करिता मराठवाडा रेल्वे कृती समितीने नागपूर येथील मेट्रो ऑफिसला प्रोजेक्ट रिपोर्ट पाठविले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला भरीव मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment