औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादचे नवीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांण्डेय यांनी रोशनगेटमध्ये नान बनविणाऱ्या एका कारागिराकडून ते कसे बनवितात हे शिकवून घेतले. पांडे यांनी यातून आपण किती खाद्यप्रेमी आहोत ते दाखवून दिले आहे. तसेच ऐतिहासिक दरवाजांसाठी हेरिटेज सफारी सुरू करण्यास रस्त्यापासून दहा फूट लांबपर्यंत मालमत्ता असाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना पांडे यांनी यावेळी दिल्या. यासोबतच शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खाद्य संस्कृतीसाठी ‘फूड सफारी’ आणि पर्यटनासाठी ‘हेरीटेज’ अॅप सुरु करण्याची संकल्पना आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी मांडली.
दरम्यान रोशनगेट, कटकटगेट परिसरात पाहणी करताना ‘नान’रोटी करणारा कारागीर आयुक्तांच्या निदर्शनास आला. त्यांनी तेथे जाऊन कारागिराला हे काय आहे? असा प्रश्न अचंबित होऊन केला. त्या कारागिरालादेखील काही समजले नाही. नंतर अधिकाऱ्यांनी, ‘साहेब, ही नान रोटी आहे’, असे उत्तर दिले. त्यावर आयुक्त म्हणाले, ‘ओके तो नान-खलिया जिसे कहते है ये वही है.’ उपस्थित नगरसेवक म्हणाले, ‘सर, ये बस नान है, खलिया अलग होता है.’ त्यावर आयुक्तांनी नान रोटी भट्टीत कशी भाजली जाते, हे पाहिल्यावर कारागिराचे कौतुक केले.
शहरातील खाद्यसंस्कृतीची माहिती देण्यासाठी फूड सफारी अॅप तयार करून त्यात येथील खास पारंपरिक पदार्थ, हॉटेलची माहिती पर्यटकांसाठी ठेवण्याची संकल्पना आयुक्तांची सुचविली. यातून शहराला वेगळी ओळख निर्माण होऊ शकेल, असे ते यावेळी म्हणाले.