औरंगाबाद – महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यावर विशेष भर दिला आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल पावणेदोन कोटी रुपये वसुली झाली, अशी माहिती मनपा उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अधिकारी अपर्णा थेटे यांनी मंगळवारी दिली. कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने आता मालमत्ता कर वसुली मोहीमेवर जास्त भर दिला आहे. त्यामुळे दररोज विशिष्ट उद्दिष्ट ठेवून औरंगाबादमधील नागरिकांकडून थकलेला कर वसूल केला जात आहे.
यंदा दोनशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट मनपाने निश्चित केले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त केली आहेत. घरोघरी जाऊन करवसुलीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे मालमत्ताधारकही करभरणा करण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत करवसुलीच्या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये 62 कोटींपेक्षा अधिक वसुली झाली आहे. पाच प्रभाग कार्यालयांची वसुली 20 लाखांपेक्षा अधिक असल्याचे उपायुक्त थेटे यांनी नमूद केले.
मालमत्ता कर वसूल करताना मालमत्ताधारकांकडून देण्यात आलेले चेक बाउन्स होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाने फसवणूक केल्याप्रकरणी कलम 138 नुसार कारवाई सुरू केली आहे. चेक बाउन्स झाल्यानंतर करभरणा करण्यासाठी नोटीस बजावताच दोन मालमत्ताधारकांनी प्रभाग कार्यालयात कराचा भरणा केला.