औरंगाबादमध्ये बनावट देशी- विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | विदेशी दारू कंपनीचे लेबल लावून स्पिरिट आणि केमिकलच्या साह्याने बनावट दारू बनविणाऱ्या गल्लेबोरगाव शिवारातील एका कारखान्यावर औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यात पोलिसांनी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.

महागड्या विदेशी कंपनीची दारू छुप्या पद्धतीने गल्लेबोरगाव शिवारातील एका शेतात असणाऱ्या कारखान्यात तयार केली जात आहे. अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.या माहिती वरून पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सापळा रचून गल्लेबोरगाव शिवारातील शेतात छापा टाकला. त्यावेळी एवढा मोठा साठा पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. पोलिसांनी संजय कचरू भागवत, महेश भागवत, योगेश डोंगरे या तिघांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. तर अंधाराचा फायदा घेत 8 ते 10 जण फरार झाले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून 18 ड्रम स्पिरिट, 79 देशी दारूचे बॉक्स, एक ट्रक सह तीन चारचाकी,दोन दुचाकी, बनावट स्टिकर, विविध कंपनीच्या दारूच्या बॉटलचे झाकण असे सुमारे 63 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like