औरंगाबाद : शहराचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आल्याने आजपासून औरंगाबाद शहर अनलॉक झाले आहे. यामुळे आता शहरवासीयांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शहरातील मॉल, व्यापारपेठा, हॉटेल, रेस्टॉरंट, बस सेवेसह क्रीडा मैदान, समारंभ नियमितपणे आता सुरू राहणार आहेत.
ग्रामीण भागाची पातळी 3 असल्याने येथे अंशतः निर्बंध लागू राहतील. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह दर 5.46 टक्के असल्याने व्यापारपेठ सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, विहार, बंद राहणार असल्याचे आदेश रविवारी जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील विशेष बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी 2.24 टक्के (पॉझिटिव्हिटी) असून व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी 2219 टक्के आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्र शासन वर्गवारीनुसार सध्या लेवल-1 मध्ये आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे ‘ब्रेक द चेन’ व कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त तथा प्रशासन यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मनपा क्षेत्रात सोमवारी सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत सुरू राहत सुधारित आदेश लागू करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले होते.