औरंगाबादकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार ! केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी ट्विट करत दिली ‘ही’ माहिती

Karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (कंप्रेहेंसिव मोबीलिटी प्लॅन) तयार करण्यासाठी आणि शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) ला नेमले आहे. केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी औरंगाबाद स्मार्ट सिटी, महामेट्रो आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहर आणि शेंद्रा ते वाळूज फ्लायओव्हर आणि मेट्रो रेल्वेसाठी एकत्रित डी पी आर देखील तयार करण्याची सूचना दिली, अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी ट्विट करत दिली.

हा आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्पाच्या निधीबाबत चर्चा करण्यासाठी डॉ. कराड हे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या भेटी घेणार आहेत. यांच्यासह औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय परिवहन मंत्र्यांना जालना रोडवरील फ्लायओव्हरसाठी पत्र लिहिले होते. त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. आज मेट्रो रेल्वेबाबत महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना सादरीकरण दिले. महा मेट्रो ही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची संयुक्त मालकीची कंपनी आहे जी नागपूर, पुणे आणि नाशिक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवत आहे. या सादरीकरणामध्ये विविध शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांबद्दल, मेट्रो रेल्वेच्या विविध मॉडेल्सबद्दल, निधीची आवश्यकता आणि निधी मॉडेल्सबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली होती.

औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ पाण्डेय म्हणाले की, औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी सीएमपी आणि एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महा मेट्रोला कार्यादेश जारी करण्यात येतील. “सीएमपी आणि डीपीआर तयार करण्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागेल, जो या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट टप्पे निश्चित करेल. निधीचे पर्याय केंद्र आणि राज्य सरकारमधील विविध मंत्रालयांना प्रस्तावित केले जातील, जे पुढील मार्ग ठरवतील,” असेही आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त व प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, औरंगाबाद स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, डेप्युटी सीईओ पुष्कल शिवम, सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, महा मेट्रोचे वरिष्ठ अतिरिक्त महाव्यवस्थापक विकास नागुलकर आणि सहाय्यक व्यवस्थापक साकेत केळकर या सादरीकरणावेळी उपस्थित होते. डॉ कराड यांनी बी.डी.थेंग अधीक्षक अभियंता (एनएचएआय) आणि महा मेट्रो प्रकल्प (संचालक) महेश कुमार अग्रवाल यांच्याशी फोनवर चर्चा केली.