Friday, June 2, 2023

वेटरच्या मरणास कारणीभूत दुचाकीस्वार अखेर जिन्सी पोलिसांकडून गजाआड; दहा दिवसांपूर्वी आझाद चौकात धडक देऊन झाला होता पसार

औरंगाबाद : हॉटेलचे काम संपल्यानंतर घराकडे पायी निघालेल्या वेटरला भरधाव दुचाकीस्वाराने उडवले होते. हा अपघात १४ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास आझाद चौक ते टीव्ही सेंटर रस्त्यावर झाला होता. यावेळी दुचाकीस्वाराने तेथून धूम ठोकली होती. या अपघातात तेजस महादेव सिरसाठ (४०, रा. एकता नगर, जटवाडा रोड, हर्सुल) यांचा मृत्यू झाला होता.

जिन्सी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अखेर आरोपीला शुक्रवारी बेड्या ठोकल्या. शेख अनिस शेख उस्मान (२०, रा. शहानवाज मस्जीद जवळ, शहानुरवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
तेजस सिरसाट हे एका हॉटेलात कामाला होते. नेहमीप्रमाणे रात्री हॉटेलचे काम संपल्यावर ते घराकडे निघाले होते. हॉटेल मालकाने सिरसाट यांना दुचाकीने आझाद चौकापर्यंत रात्री बाराच्या सुमारास आणून सोडले. तेथून ते घरी एकता नगरकडे जाण्यासाठी पायी निघाले. याचवेळी एका उभ्या ट्रकच्या समोरून सिरसाट निघताच मागून भरधाव दुचाकीने आलेल्या शेख अनिस याने त्यांना उडवले. त्याच्या सोबत एक बारा वर्षाचा बालक देखील दुचाकीवर होता. अपघात होताच अनस शेख याने तेथून धूम ठोकली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात १७ रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. रात्रीचा अपघात असल्याने आणि प्रत्यक्षदर्शी कोणीही नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेणे कठीण जात होते.

दरम्यान,गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक गोकुळ एल. ठाकुर करत होते. त्यांनी  आरोपीच्या शोधासाठी आपले खबरी आणि अपघाताच्या परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली. अखेर २४ जून रोजी सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीआधारे शेख अनस याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून अपघातातील दुचाकी (एमएच-२०-सीसी-९७१४) देखील हस्तगत केली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक हारुण शेख करत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ निखिलगुप्त, उपायुक्त दिपक गि-हे, सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्हि. एम. केंद्रे, उपनिरीक्षक गोकुळ एल.ठाकुर यांनी केली.