Saturday, June 3, 2023

अजिंक्य रहाणेचा ‘तो’ निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक – रिकी पॉंटिंगने केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतासाठी परिस्थिती सकारात्मक नव्हती. 400 धावांपेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत असतानाच अजिंक्य रहाणे बाद झाल्याने भारताचा डाव लवकरच आटपेल अस वाटत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठी चाल खेळली.

रहाणे बाद झाल्यानंतर सर्वाना वाटले की आता हनुमा विहिरी फलंदाजीला येईल, पण कर्णधार अजिंक्य रहाणेने विहारी ऐवजी रिषभ पंत ला पाठवले. रिषभ पंतने देखील कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आक्रमक फलंदाजी करून यजमान ऑस्ट्रेलियालाच बॅकफूटवर ढकलले. मोक्याच्या वेळी रिषभ बाद झाला नसता तर भारताने एक ऐतिहासिक विजय देखील मिळवला असता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या अजिंक्य रहाणेच्या निर्णयाचे कौतुक केले. हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक होता असे पाँटिंगने म्हटले आहे. “कर्णधार या नात्याने ऋषभ पंतला वरती फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय खूपच चांगला होता. संघाच्या विजयाच्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना तसे करणे भाग होते. पेनने ऋषभ पंतचे काही झेल सोडल्यामुळे त्याला नशिबाची सुद्धा साथ मिळाली” असे पाँटिंगने म्हटले आहे. “पंतला मैदानावर पाठवण्याचा निर्णय मास्टरस्ट्रोक होता. त्याने चांगला खेळ केला. तो त्याच्या पद्धतीने आत्मविश्वासाने खेळला” अशा शब्दात पाँटिंगने पंतचे कौतुक केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’