हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी (AUS Vs SCO) राखून पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात ट्रेव्हिस हेड आणि मार्कस स्टोइनीस यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. विजय जरी कांगारूंचा झाला असला तरी याचा थेट फायदा इंग्लंडला झाला आहे. कारण स्कॉटलंडच्या पराभवामुळे इंग्लंडच्या संघाला सुपर-८ चे तिकीट मिळालं आहे. जर आजचा सामना स्कॉटलंडचा संघ जिंकला असता तर सुपर-८ चे समीकरण बदललं असत.
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्कॉटलंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत कांगारूंच्या बॉलर्सचा फेस काढला. स्कॉटलंडने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८० धावा केल्या होत्या. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक ६० धावा केल्या, त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारत कांगारूंना बॅकफूटवर ढकललं. त्याच्याशिवाय रिची बेरिंग्टनने ३१ चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर नाथन एलिस, ॲडम झाम्पा आणि एश्टन एगर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
प्रत्युत्तरात १८१ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या १ धावेवर बाद झाला तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मिशेल मार्श सुद्धा ८ धावांवर माघारी परतला. मात्र मार्कस स्टोइनीस आणि ट्रेव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत आणि मोठं मोठे शॉट मारत स्कॉटलंडच्या बॉलर्सची धुलाई केली. ट्रॅव्हिस हेडने ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ६८ धावा कुटल्या. तर मार्कस स्टॉयनिसने २९ चेंडूत ५९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडने अखेरच्या काही ओव्हर मध्ये डावाची सूत्रे आपल्या हाती घेतले. त्याने १४ चेंडूत नाबाद २८ धावा करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे स्कॉटलंड स्पर्धेबाहेर गेला आणि इंग्लंडला सुपर-८ चे तिकीट मिळाले.खरे तर इंग्लंड आणि स्कॉटलंड दोघांचेही प्रत्येकी ५-५ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत इंग्लंड (+३.६११) पुढे असल्याने त्यांना फायदा झाला. स्कॉटलंड पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे