Friday, June 2, 2023

वाहन विमा 20 टक्क्यांपर्यंत महागणार ! सर्व वाहनधारकांना बसणार फटका

नवी दिल्ली । आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीनंतर देशातील करोडो वाहनधारकांना अजून एक धक्का बसणार आहे. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याची गरज आहे. कंपन्यांची मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

IRDAI ला दिलेला प्रस्ताव
Zeebiz च्या रिपोर्ट्स नुसार, भारतात सुमारे 25 सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDA हिरवा कंदील देईल, अशी कंपन्यांना आशा आहे. कंपन्यांचा असा विश्वास आहे की, त्यांना कोरोनामुळे खूप त्रास होत आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांची सॉल्व्हेंसी त्यांच्या विहित मर्यादेच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.

आवश्यक थर्ड पार्टी विमा
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. विमा प्रीमियम IRDAI द्वारे निर्धारित केला जातो. प्रीमियम दरवर्षी बदलतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.