जयवंत शुगर्सला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागातील सन २०२०-२१ गळीत हंगामासाठी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पुणे येथे झालेल्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले व विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मांजरी (पुणे) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर व्ही. एस. आय. चे उपाध्यक्ष व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, साखर आयुक्त शेखर गायकवाड, व्ही. एस. आय. चे महासंचालक शिवाजीराव देशमुख, संचालक संभाजी कडू-पाटील, नियामक मंडळाचे संचालक गणपतराव तिडके, नॅशनल हेव्ही इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, विशाल पाटील, राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, आ. प्रकाश आवाडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, नरेंद्र घुले-पाटील, साखर उद्योजक नरेंद्र मुरकुंबी प्रमुख उपस्थित होते.

जयवंत शुगर्सने सन २०२०-२१ या गळीत हंगामात १०० टक्क्यांहून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजे १०२.७७ टक्के गाळप क्षमतेचा वापर करत, १२.५७ टक्के इतका साखर उतारा घेतला. तसेच रिड्यूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी ८६.७८ टक्के, तर रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९६.५३ टक्के राहिले. विशेष म्हणजे जयवंत शुगर्सने साखर तयार करण्यासाठी फक्त १८.०१ टक्के इतकाच बगॅसचा वापर केला. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्ही.एस.आय.कडून सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जयवंत शुगर्सला प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, उपसरव्यवस्थापक आर. आर. इजाते, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, डेप्यु. चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, इलेक्ट्रीक इंजिनिअर वाय. बी. पिसाळ उपस्थित होते. दरम्यान, जयवंत शुगर्सचे ऊसउत्पादक शेतकरी चंद्रकांत हणमंत यादव (रा. सासपडे) यांना ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. यादव यांनी सन २०१९-२० या गळीत हंगामात २७८.३९० मे. टन प्रति हेक्टर उत्पादन घेतले आहे.