हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवी मुंबईत (Mumbai) हॉटेलमधील स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. ऐरोली येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या काही महिलांना जेवणात उंदराचे पिल्लू सापडले आहे. महिला दिनाच्या निमित्ताने सेलिब्रेशनसाठी हॉटेलमध्ये गेलेल्या या महिलांनी मंच्युरीयन ऑर्डर केले होते. मात्र, पदार्थ खाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना त्यात काहीतरी विचित्र असल्याचे जाणवले. नीट पाहिल्यानंतर त्यांना चक्क उंदराचे पिल्लू आढळले, यानंतरच हा किळसवाणा प्रकार सर्वांच्या समोर आला.
या प्रकारानंतर संबंधित महिलांनी तातडीने हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी पर्पल बटरफ्लाय हॉटेलविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे आता स्थानिक अन्न व औषध प्रशासनानेही या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. तसेच ग्राहकांनी हे हॉटेल बंद करण्याची देखील मागणी केली आहे.
चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात बनावट पनीर जप्त
दुसरीकडे, चंद्रपुरात अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 472 किलो बनावट पनीर जप्त केले आहे. उन्हाळा सुरू होताच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. मात्र, त्याचा गैरफायदा घेत काही व्यापारी ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला समजले.
पोलिसांच्या कारवाई त्यांनी सपना डेली नीड्स या दुकानातून 197 किलो बनावट पनीर जप्त करण्यात केले. तसेच, मुख्य गोल बाजारातील न्यू भाग्यश्री घी भंडार या दुकानातून आणखी 275 किलो साठा सापडला. चीज अनॅलॉग नावाने हा पदार्थ ग्राहकांना पनीर म्हणून विक्री केला जात होता. दोन्ही दुकानांमधील साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता अहवाल आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे अन्न स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महत्वाचे म्हणजे आता मुंबईमध्ये मंचुरियनमध्ये उंदीर आढळून आल्यामुळे प्रशासनाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले जात आहेत. तसेच, हॉटेल मध्ये सुरू असलेले हे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी वारंवार ग्राहकांकडून केली जात आहे.