हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबागेत जाऊन भेट (Bacchu Kadu Meet Sharad Pawar) घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे महायुती समर्थक आमदार आहेत, मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर ते महाविकास आघाडीत सामील होणार का अशा चर्चांना जोर आला आहे. मात्र तूर्तास महायुती सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही हेतू नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, शरद पवारांसोबत भेट (Bacchu Kadu Meet Sharad Pawar) हि आधीच ठरली होती. आमचा जो काल मोर्चा झाला त्यासंदर्भांत आम्ही जस राज्य सरकारला निवेदन दिले त्याचप्रमाणे या मुद्द्यावरून शरद पवारांशी चर्चा केली. मुद्द्यांवरच राजकारण झालं पाहिजे शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधव आणि जे कोणी लोक अडचणीत आहेत त्यांच्या मुद्द्यावरून राजकारण झालं पाहिजे. ते मुद्दे घेऊन चर्चा झाली पाहिजे आणि प्रश्न निकाली लागले पाहिजेत असं बच्चू कडू यांनी म्हंटल. १ सप्टेंबरपर्यंत आम्ही महायुती सरकारला वेळ दिला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी नाराज नाही तर शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांच्या नाराजीचा सूर आम्ही सरकार समोर ठेवत असतो, आमच्या बांधवांच्या मागण्या पूर्ण व्हावेत हीच आमची मागणी आहे असं बच्चू कडू यांनी म्हंटल.
झेंडा नाहीतर अजेंडा महत्वाचा आहे. जाती धर्माचा जसा मुद्दा होतो तसा शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग यांचे मुद्दे राजकारणात चर्चेला आले पाहीजे. करीता आज पुणे येथे खा. शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली. pic.twitter.com/m4YGihwtyW
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) August 10, 2024
दरम्यान, तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्या मुद्दांसाठी महाविकास आघाडीत सामील होणार का असा सवाल केला असता शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगबांधवांसाठी आम्ही काहीही करू असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट संकेत दिले आहेत. जो काही निर्णय असेल तो आम्ही १ सप्टेंबर नंतर जाहीर करू असं म्हणत बच्चू कडू यांनी राज्यातील महायुती सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही राजकारण आणखी बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने राज्य सरकारच्या विरोधात ९ ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढून सरकारला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगारांच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या. ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबर ला मुंबईत धडक देणार, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला
बच्चू कडू यांच्या मागण्या काय? Bacchu Kadu Meet Sharad Pawar
सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकरी कर्जमाफी, दोन वर्षातील कर्जाच्या व्याज आणि मुद्दलावर ५० टक्के सवलत मिळावी
शेतमजुरांसाठी स्वतंत्र योजना सुरू करावी, स्वतंत्र कांदा निर्यातबंदी धोरण बनवावे, फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे.
दिव्यांगांना मिळणाऱ्या मासिक वेतनात वाढ करावी, त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे.
शहरी व ग्रामीण घरकुल योजनांमधील निधीत समानता आणावी, बेघरांना घरे द्यावीत.