हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जमाफी हा विषय हा एका संघटनेचा, जातीचा किंवा धर्माचा नसून हा विषय संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर्जमाफीसाठी आम्ही सगळ्या संघटनांनी आपापसातले मतभेद बाजूला सारून एक समान कार्यक्रम आखून शेतकऱ्यांसाठी एकत्र आले पाहिजे. कारण शेतकऱ्यांची चळवळ ही संपली नाही पाहिजे. जर चळवळ संपली तर या शेतकऱ्याना वाली कोण राहणार नाही अशी भूमिका मांडली प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी मांडली आहे.
पुण्यात आयोजित केलेल्या शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी आपापसातले मतभेद बाजूला सारून सर्व शेतकरी संघटनेला एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शेतकरी नेते अजित नवले, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील, राष्ट्रीय समाज पार्टीचे सचिन पाटील हे परिषदेला उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात बच्चू कडू म्हणाले की, धर्माच्या आणि जातीच्या प्रश्नावर कधी दोन गट पडत नाहीत. पण शेतकरी प्रश्नावर मात्र संघटनेत दोन गट पडतात , त्यामुळे आपलं वाटोळ झालेला आहे. शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेने आपासातील मतभेद बाजूला सारून किमान समान कार्यक्रम आखून शेतकरी कर्जमाफीसाठी एकत्र आलं पाहिजे, कारण जाती पतीच्या लढाईला फार फार कष्ट घ्यावे लागत नाही.. पण आपल्या हक्काच्या लढाई ला मात्र फार कष्ट घ्यावे लागतात.. आपण शेतकरी म्हणून कधी एकत्र येत नाहीत म्हणून आपली कोणीही येऊन लुबाडणूक करून जाते..
शेतकऱ्यांनी यापुढे अधिक मोठ्या संख्येने एकत्र आले पाहिजे. जर आपण एकत्र आलो तर बजेटमध्ये आपल्याला पन्नास टक्के वाटा दिला जाईल. पण शेतकऱ्यांना सरकारने धर्माच्या आणि जातीच्या झेंडाखाली बांधले आहे. ही जाती धर्माची जोखड फेकून द्यावी लागेल आणि आपल्याला परत एकदा आपल्या हक्कासाठी सरकारच्या विरोधात बंड पुकारावे लागेल असं आवाहन शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडूंनी केल आहे.




