अमरावती प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रा सुरू असून यात्रेच्या माध्यमातून बच्चू कडून सर्वसामान्य शेतकरी, महिला यांच्या व्यथा जाणून घेत आहे. आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लोही बाजार गावातून जात असताना एक आजीबाई बच्चू कडू यांना पडक्या घरात बसलेली दिसून आली. तेव्हा बच्चू कडू यांनी त्या आजीबाईंशी चर्चा करीत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तेव्हा आजींना राहायला पक्के घर नसून पडक्या घरात त्या राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता बच्चू कडू यांनी त्या आजीबाईला पूर्ण घर व्यवस्थित करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पाहिजे तेवढे पैसे आम्ही देतो उद्यापासून घरच्या बांधकामास सुरुवात करा, अशा सूचना कडू यांनी दिल्या. आजीबाई काळजी करू नका, जोपर्यत बच्चू भाऊ जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही, असे भावनिक आश्वासन देखील कडू यांनी आजींना दिले.
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,” या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजेच पापळ येथून आक्रमक सुरुवात केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून ही पदयात्रा उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे पार करत 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे.
दरम्यान, ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रा लोही बाजार या ठिकाणी दाखल झाली. तेव्हा शेतकरी, गावातील ग्रामस्थांनी यात्रेचे स्वागत करत यात्रेत मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गावातून यात्रा जात असताना बच्चू कडू यांनी शेतकरी, कष्टकरी लोकांच्या व्यथा, समस्या जाणून घेतल्या.