हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्या मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठीच तिसरी आघाडी तयार करण्यात येत आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा देशात भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना? मग तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का ? असा सवाल करत जीभ सांभाळून बोला, बावळट पोरासारखं बोलू नका अशा शब्दात बच्चू कडू यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, संजय राऊतांना अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. जेव्हा देशात भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना? मग तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का असा सवाल बच्चू कडू यांनी केला. महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर काय तुमचाच हक्क आहे का? लढण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. आमच्या तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपला होईल कि काँग्रेसला होईल ते तुम्ही कस ठरवता? त्यामुळे अभ्यास न करता एखाद्या बावळट पोरासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही, त्यांनी जीभ सांभाळून बोलत राहावं असं म्हणत बच्चू कडू यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत याना तिसऱ्या आघाडीबाबत सवाल करण्यात आला होता, त्यावेळी ते म्हणाले, तिसरी आघाडी ही कायमच सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचे काम तिसरी आघाडी करत असते. जे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतात ते तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवतात हा आत्तापर्यंतचा इतिहास आणि अनुभव सांगतो. खरं म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये विधानसभेची लढत आहे,पण महाविकास आघाडीची काही मते कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या आघाड्या स्थापन करायच्या, पैशाचा वापर करायचा असं धोरण मला दिसत आहे असेही संजय राऊतांनी म्हंटल.
बच्चू कडू याना महाविकास आघाडीची ऑफर –
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र बच्चू कडू याना थेट महाविकास आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं. आम्ही भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाराष्ट्रात आम्ही एका आघाडी तयार केली आहे. परंतु आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे, आम्हाला बच्चू कडू यांची काहीही अडचण नाही. त्यामुळे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी जर महाविकास आघाडीत आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू असं म्हणत जयंत पाटील यांनी बच्चू कडू याना खुली ऑफर दिली आहे.