हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट शेतकऱ्यांना दम देऊन त्यांची औकात काढल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलं आहे. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांशी बोलताना ज्याप्रकारची भाषा वापरली त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सावंत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनीही तानाजी सावंत यांच्यावर संताप व्यक्त करत आता शेतकरी तुम्हाला तुमची औकात दाखवेल असा इशारा दिला आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्याची औकात काढणे एवढं काय सोप्प नाही. त्यामुळे अशा पद्धतीने बोलून कोणताही मंत्री शेतकऱ्यांची औकात काढण्याचे धडक करत असेल तर शेतकरी त्याना त्यांची औकात दाखवेल. यापूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हंटल होते, तर शेतकऱ्यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत पाडलं. त्याचप्रमाणे तानाजी सावंत यांनाही परिणामांना सामोरे जावं लागेल असं म्हणत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.
तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते?
धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारला. मात्र तानाजी सावंत हे संतापल्याचे पाहायला मिळालं. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत. सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही असं तानाजी सावंत शेतकऱ्यांना म्हणाले. त्यांचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ते या विडिओनंतर ते टीकेचे धनी बनले आहेत.