बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार

Bachhu Kadu (2)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सहा दिवसापासून सुरु होते. दरम्यान, आज सातव्या दिवशी बच्चूभाऊ यांनी सरकारणे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे. आपण आंदोलन स्थगित केले आहे थांबवलेले नाही असे म्हणत २ ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे.

“आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केलं आहे. दिव्यांगांच्या बाबतीत आपण २५ मागण्या केल्या होत्या त्यापैकी २० मागण्या आपण मान्य करून घेतल्या हे आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे. आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत. आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी अन्यथा महात्मा गांधीजींच्या जयंतीदिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू,” अशा इशारा देत बच्चू कडू यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

संत तुकडोजी महाराजांची भूमी असलेल्या मोझरी येथे प्रहारचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु होते. आज सातव्या दिवशी शनिवारी पोटात अन्न नसल्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालवली होती. बच्चू कडू यांची ढासळलेली प्रकृती पाहून एक कार्यकर्ता तुम्ही उपोषण मागे घेतले नाही तर आत्मदहन करेन. कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचे कडू यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान, त्यांच्या आंदोलन स्थळी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, आजच्या घडीला शेतीचा प्रश्न सुटणे अत्यंत महत्वाचा आहे. आज पुण्यात राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत सांगितले. आपल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून आपल्या आंदोलनाला हे मोठे यश आहे. आता आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असून जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर २ आँक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.

राज्यात उद्या प्रहार पक्षाचे होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशा सूचना यावेळी बच्चू कडू यांनी केल्या. व त्यानंतर दोन अपंग यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी पाणी घेऊन आपले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले.