अमरावती | आशिष गवई
अचलपूरचे डॅशिंग आमदार आणि राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी खातेवाटपानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला अपेक्षापेक्षा जास्त मिळाले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या जबाबदारीबद्दल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आभार व्यक्त केलं आहे. आपण अपंगांसाठी काम करत असल्यामुळे सामाजिक न्याय खातं आपल्याला मिळावं अशी माझी इच्छा होती परंतु खातं कोणतही मिळालं तरी आपण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू असं कडू पुढे म्हणाले.
बच्चू कडू यांना जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास तसेच कामगार कल्याण आणि इतर मागास प्रवर्गांच्या राज्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विदर्भातील पाण्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जलसंपदा खात्याचा कारभार सांभाळायला मिळाल्याचा आनंदच असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
शेतकरी आणि कामगारवर्गाकडे प्राधान्याने लक्ष देऊ असं सांगतानाच जे अधिकारी चांगले काम करतील त्यांना खांद्यावर घेऊ मात्र जे अधिकारी कामचुकारपणा करतील त्याना त्यांची जागा दाखवून देऊ असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला. ज्या ठिकाणी चूका होत असतील त्या दुरुस्त करू असं सांगत महाविकासआघाडीत तीन पक्ष एकत्र आल्यामुळे थोड्याफार प्रमाणात धुसफूस, भांडण-तंटे होणारच, पण ते जास्त मनावर घ्यायची गरज नसल्याचं कडू म्हणाले.