अमरावती । शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी येत्या २४ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणारा असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुमारे 138 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आज देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्व. साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण येथे समारोप झाला. यावेळी समारोपाच्या भाषणात बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील हे सुद्धा उपस्थित होते.
चिलगव्हाण येथील समारोप भाषणात बच्चू कडू म्हणाले, आपल्याला शेतकरी आणि शेतमजूर या दोघांनाही सोबत घ्यायचं आहे. मेंढपाळ असो वा मच्छीमार असो, या सर्वांचे प्रश्न आपण मांडलेत. आपण असेच काम करत राहिलो तर २ ऑक्टोबरच्या आतच सातबारा कोरा होईल. याचाच भाग म्हणजे २४ तारखेला २ तास आपण संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करू. ते आंदोलन कस करायचे याबाबतची कल्पना मी तुम्हाला फोन करून देईन. परंतु आंदोलनाच्या २ दिवस आधी घरी थांबू नका, कारण पोलीस तुम्हाला पकडून घेऊन जातील. त्यामुळे २ दिवस घरापासून बाहेर रहा आणि २४ तारखेला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत २ तास संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करूया.
ते पुढे म्हणाले, आयुष्यात पद आणि मान – सन्मान हेच सगळं काही असं नसतं, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक उपाय सांगितला आहे, पेरणी ते कापणीपर्यंतच सगळा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत व्हावा. आता पेरणी ते कापणी पर्यंत जी मजुरी लागते ती मजुरी मनरेगाच्या माध्यमातून कव्हर केली तर शेतकऱ्याचा ६० टक्के खर्च वाचेल. .. त्यामुळे गावातील मजूरही सुखी होईल आणि शेतकऱ्याचा खर्चही वाचेल. तसेच दुर्दैवाने गारपीठ वगैरे जरी आली तरी शेतकऱ्याचं नुकसान हे ४० टक्केच होणार आहे. म्हणजेच नुकसान भरपाईची चिंता राहणार नाही आणि भाव जरी कमी मिळाला तरी शेतकरी फायद्यात राहील असं बच्चू कडू यांनी म्हंटल.




