Badlapur Case : बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Badlapur Case : बदलापूर येथील एका नावाजलेल्या शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांनी केलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. सकाळी रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी सातत्याने आवाहन करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक सुरू केली तर दुसरीकडे शाळेबाहेर असलेल्या आंदोलकांनी शाळेचं गेट तोडून आत मध्ये प्रवेश केला आणि तोड फोड करायला सुरुवात केली. बदलापूरकरांना न्याय हवा आहे, वारंवार आरोपीला फाशी देण्यात यावी असा एकच सूर येथील आंदोलकांनी पकडलेला आहे. आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी ची (SIT) घोषणा केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बदलापूर प्रकरणी एसआयटी (SIT) ची नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं असून फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा दिले आहेत “

दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर पालकांचा उद्रेक झाला आणि आज सकाळपासूनच नागरिकांनी येथील घटना झालेल्या शाळेला घेराव घातला. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांनी रेल रोको करत रेल्वे ट्रॅक वरच ठिय्या मांडला. वारंवार आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

त्यानंतर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जाऊन बदलापूर येथील रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर उतरून रेल्वे रूळ रिकामे केल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. वारंवार पोलिसांनी सूचना करून देखील आंदोलक आक्रमक झाले होते. त्यावरूनच ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येत आहे.

तर तिकडे शाळेच्या बाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी शाळेची तोडफोड देखील केली आहे. शाळेच्या बाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधाराच्या फोडाव्या लागल्या. काही काळ हिंसक झालेल्या आंदोलनाला पुन्हा शांततेत सुरुवात झाली असून पोलिसांचा मोठा फौज फाटा बदलापुरात तैनात करण्यात आला आहे. एवढंच नाही तर शाळेच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.