राज्यभरामध्ये विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येत असून प्रामुख्याने मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यापासून ते अगदी उपनगरांपासून मुख्य शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यापर्यंतच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची नवी मुंबई आणि मुंबईला थेट जोडणी करण्यात येणार आहे. म्हणजेच मुंबईची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. मंगळवारी एमएमआरडीए च्या 158 व्या प्राधिकरण बैठकीमध्ये राज्य सरकारने बदलापूर ते विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाच्या प्राथमिक आखणी अहवालाला मान्यता दिली आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती…
केवळ 20 मिनिटात मुंबई
बदलापूर नवी मुंबई विमानतळ प्रवास अति वेगवान आणि सुकर होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बदलापूर नवी मुंबई विमानतळ दरम्यानचा प्रवेश नियंत्रण मार्ग म्हणजेच एक्सेस कंट्रोल रोड या नव्या प्रकल्पाची योजना आखली आहे. यासाठी 10.83 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर बदलापूर नवी मुंबई अंतर हे केवळ 20 मिनिटात पार करता येणार आहेत. म्हणजे या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या शहरांमधून मुंबईत येण्यास लागणाऱ्या प्रवासाच्या वेळात 60 मिनिटांची म्हणजेच एक तासाचे तर नवी मुंबई पर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत अर्धा तासाचे म्हणजेच 30 मिनिटांची बचत होणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एनएआयएन शी कनेक्टिव्हिटी करून देईल. तसंच ठाणे आणि जवळपासच्या मार्गावरील वाहतूक कोंडी देखील यामुळे कमी होणार आहे.
कसा असेल मार्ग
बदलापूर नवी मुंबई हा प्रस्तावित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे मुंबई -बदलापूर आणि विरार- अलिबाग असा प्रवासही या मार्गामुळे करता येणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येणार आहे प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर पाच वर्षात पूर्ण करण्याचा एमएमआरडीए चे नियोजन आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
- हा मार्ग आठ लेनचा असेल शिवाय मार्गीका विभाजित असतील आणि सर्विसरोडही असतील.
- या मार्गावर 80 किलोमीटर प्रति तासाचा वेग कायम ठेवता येणार आहे
- प्रमुख मार्गांशी जोडण्यासाठी मोठ्या इंटरचेंजचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात मुंबई-वडोदरा स्पर, काटई-बदलापूर आणि कल्याण रिंग रोड यांचा समावेश आहे.