औरंगाबाद प्रतिनिधी । बँकेतून पैसे काढून बाहेर निघणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेऊन त्यांचे लाखो रुपये लंपास करणारी आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतील कुख्यात बॅग लिफ्टिंग गॅंग औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने पैठणमधून पकडली आहे. या टोळीने मागील अनेक महिन्यापासून धुमाकूळ घालत पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ही टोळी खूपच नियोजन बद्ध रीतीने चोरीच्या घटना आखत असत. सर्व टोळी पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी ही टोळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहत होती. पैठण येथून हे वेगवेगळ्या प्रवासी साधनांनी औरंगाबाद शहरात यायचे. शहरातील प्रमुख बँकेबाहेर काहीजण आणि बँकेमध्ये काही असे विभागणी करून मोठी रक्कम काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवायचे. रक्कम ठेवलेली बॅग पळवून एकत्र न जाता आल्याप्रमाणे वेगवेगळ्या वाहनाने ते परत पैठणला जायचे.
मागील अनेक महिन्यापासून सातत्याने शहर आणि परिसरातील अनेक भागांत नागरिकांनी बँकेतून काढलेल्या पैशावर चोरटे डल्ला मारत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र बॅग लिफ्टिंग केल्यावर आरोपी क्षणातच पसार होत होते. सातत्याने घडत असलेल्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.तर या टोळीने पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. अशा घटनांना तडीस नेणारी ही टोळी स्थानिक नसून हैद्राबाद आणि तामिळनाडूची आहे पैठण येथे दोन वेगवेगळ्या घरात किरायाने राहतात अशी माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने पैठण येथे नारळ भागात सापळा रचला व तेथे दुसऱ्या मजल्यावर घरात असलेल्या सर्व सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. या टोळी कडून पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी, रोख 50 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला असून ही टोळी बनावट ओळखपत्र तयार करून शहरात राहत होती.औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक गुन्हे केले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.या टोळीने औरंगाबादमध्ये सिडको, जिन्सी, जवाहरनगर, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे सह सहा ठिकाणी नागरिकांवर पाळत ठेऊन रकमेची बॅग लंपास केले असल्याचे समोर आले आहे.