सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
लोणंद येथील बजाज फायनान्स कंपनीच्या शाखेतून घेतलेल्या पर्सनल लोन घेतलेल्या एकाची मॅनेजरनेच फसवणूक केल्याचे समोर आली आहे. कर्जाचे हप्ते भरल्यानंतर खोट्या पावत्या देवून कर्जदाराची फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चैतन्य विनोद खरात (रा. लोणंद, ता. खंडाळा) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लोणंद (ता. खंडाळा) येथे असलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या ऑफिसमधून सुरज सुभाष शेळके यांनी 2 लाख 16 हजार 300 रुपयांचे पर्सनल लोन घेतले होते. सुरज शेळके यांनी बजाज फायनान्स कंपनीच्या लोणंद शाखेचे मॅनेजर चैतन्य खरात यांच्याकडे पर्सनल लोनसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी 1 लाख 55 हजार रुपये दिले होते. खरात यांनी ही रक्कम कंपनीला न भरता ती स्वत:च्या फायद्यासाठी वापरली आहे.
तसेच संबंधित हप्त्याचे पैसे भरल्याच्या खोट्या पावत्या देवून फसवणूक केली असल्याचे सुरज शेळके यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चैतन्य खरात याच्याविरुध्द लोणंद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ग्राहकांच्यात फायनान्स कंपनीच्या कारभाराविषयी खळबळ उडाली.