हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा विरुद्ध ओबीसी … अशी स्पष्ट लढत महाराष्ट्रातल्या कोणत्या मतदारसंघात बघायला मिळणार असेल तर ती बीडमध्ये… बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात प्रमुख लढत आहे. मुंडे कुटुंबाच्या प्रस्थापित राजकारणाला बीडच्या बालेकिल्ल्यात कुणाला न लावता आला नाही. त्याच्या जोरावर आधी गोपीनाथ मुंडे, मग दोन टर्म प्रीतम मुंडे आणि आता पंकजा मुंडे लोकसभेवर जाण्यासाठी मैदानात आहेत. धनंजय मुंडे महायुतीत आल्याने आपल्या बहिणीसाठी त्यांनी जिल्ह्यात फिल्डिंग लावलीय. कागदावरही पंकजाताईंना बीड लोकसभा सोपी जाणार असली तरी ग्राउंड काही वेगळंच सांगतय. अगदी शेवटच्या काही दिवसांत शरद पवारांनी बीडचं समाजमन ओळखून टाकलेले काही डाव पाहता पंकजा मुंडे यांची खासदारकी सध्या तरी धोक्यात दिसतेय. मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातीची किनार असलेल्या मतदारसंघात सध्या सामना अटीतटीचा आहे… त्यामुळे बीडात मुंडे जिल्ह्यावरचं आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवणार की परिवर्तन होऊन बजरंगाची कमाल बघायला मिळणार?
गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवला तो पंकजा मुंडे यांनी… फडणीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये त्या आमदार झाल्या… मंत्रीपद ही त्यांच्या वाट्याला आलं…पण हळूहळू मुंडेंच्या प्रस्थापित राजकारणाला महाराष्ट्र भाजपकडून साईडलाईन केलं जाऊ लागलं… 2019 च्या निवडणुकीत तर स्वतःच्या बालेकिल्ल्यातून म्हणजे परळीतूनच त्या आमदारकीला पडल्या… यानंतर भाजपकडून राम शिंदे, धनंजय महाडिक, गोपीचंद पडळकर, मेधा कुलकर्णी या सगळ्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं… पण या प्रत्येक वेळेस डावलण्यात आलं ते पंकजा मुंडेंना… यानंतर पंकजा मुंडे यांची पक्षावरची धुसफूस अनेकदा बाहेर पडत होती. जाहीर सभेतून त्यांनी ती अनेकदा बोलूनही दाखवली. विनोद तावडेंच्या हस्तक्षेपामुळे म्हणा… किंवा ओबीसी मतं विरोधात जाऊ नये यासाठी केलेली खेळी… पंकजा ताईंना पक्ष कार्यकारणीची जबाबदारी देण्यात आली. पण त्यांचं मन त्यात काही रमलं नाही. अखेर 2024 ची भाजपसाठी प्रत्येक सिट महत्वाची असल्याने प्रीतम मुंडे यांच्या जागी थेट पंकजा मुंडे यांना खासदारकीच्या मैदानात उतरविण्यात आलं… भाजपने ही खेळी करून एकाच दगडात दोन पक्षी मारले. पहिलं म्हणजे पंकजाताई आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली तर दुसऱ्या बाजूला बीडचा गड भाजपसाठी आणखीन मजबूत केला.
तर पंकजा ताईंच्या विरोधात शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनावणे आणि ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. 2019 च्या निवडणुकीत अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या बजरंग बाप्पांना लोकसभा मिळावी यासाठी पवार आणि मुंडे या दोघांनीही बरेच प्रयत्न केले. तेव्हा ती उमेदवारी त्यांना मिळालीही… 2019 ला बाप्पांनी सर्व ताकदीनिशी प्रीतम मुंडे यांना फाईट दिली. पण मोदी लाट, ओबीसी वंजारी जातींचं समीकरण आणि मुंडे नावाला मानणारा हक्काचा मतदार यांच्या जीवावर प्रीतम ताई पुन्हा खासदार झाल्या. यानंतर बजरंग बाप्पा हे जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच ॲक्टिव्ह राहिले… साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी विणलेलं उद्योगधंद्याचं जाळं यामुळे बजरंग बाप्पा यांची पॉलिटिकल इमेज चांगलीच बिल्ड अप झाली होती. त्यामुळे मेटे की सोनवणे या वादात बजरंग बाप्पा यांची सरशी झाली. अन् सोनवणे विरुद्ध मुंडे अशी बीडची लढत फिक्स झाली…सध्या महायुती एकाच छताखाली निवडणुकीला सामोरं जातेय. त्यात धनंजय मुंडे यांची ताकद भाजपला जोडली जाणार असल्याने बीडमध्ये पंकजा ताई यांचं पारडं जड दिसतंय. पण जातींच्या राजकारणावर ज्या बीडचा खासदार ठरतो. तिथं मात्र ग्राउंड रियालिटी पाहता पंकजा ताईंना बजरंग बाप्पा जड जातील…
आणि त्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचं मूळ
मनोज जरांगे पाटलांनी ज्या मराठा आरक्षणाची ठिणगी पेटवली त्याचा सेंटर पॉईंट हा बीड होता. जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाज एकवटला. त्यात छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार करून मराठा विरुद्ध ओबीसी यांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं. याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठे बघायला मिळणार असेल तर तो बीड लोकसभा मतदारसंघात. वंजारी समाज आणि ओबीसी समाजाचा मोठा सपोर्ट हा भाजपाच्या आणि पर्यायाने मुंडेंच्या पाठीशी राहिलाय. पण शरद पवारांनी बीडमध्ये मराठा कार्ड खेळत बजरंग बाप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं. त्यामुळे बीडच्या लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातींची कडवी लढत पाहायला मिळणारय. मनोज जरांगेंनी स्पष्ट भाषेत मराठा उमेदवारांचं काम करा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याने बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनावणेंच्या पाठीशी मराठ्यांची मोठी ताकद लागू शकते… आणि हाच बजरंग बाप्पांचा प्लस पॉईंट ठरणार आहे…केज हा पट्टा बजरंग साेनवणे यांचा. या पट्ट्यात त्यांचा साखर कारखाना आहे. त्यामुळे उसाचे राजकारण या भागात प्रभावी ठरेल. तसेच जातीची तुतारीही त्यांनी जोरदारपणे फुंकली आहे. त्याचा परिणाम आंतरवली सराटीला जवळ असणाऱ्या गेवराई, माजलगाव या पट्टयात तुतारीला चांगलं लीड मिळेल, असं बोललं जातंय… मराठा समाजाने बजरंग सोनवणे यांचे गावोगावी मोठे स्वागत केलंय. तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंची अनेक गावांत प्रचाराच्या वेळेस मराठा समाजाकडून अडवणूक करण्यात आलीय. यावरून जरांगे फॅक्टरमुळे मतदारसंघाचं वारं काही प्रमाणात तुतारीच्या बाजूने वळलं आहे…
बीड लोकसभेवर मागील पंधरा वर्षांपासून मुंडे कुटुंबाचाच सदस्य हा खासदार राहिलाय. मात्र असं असूनही विकासाच्या अनेक मुद्द्यांना मतदार संघात साधा स्पर्शही करण्यात आलेला नाहीये… सध्याही बीडच्या लोकसभेच्या प्रचारात विकासकामांच्या मुद्द्यांचे कमी आणि जातीच्या राजकारणावर सर्वाधिक भर आहे. त्यामुळे मुंडे घराण्याविषयी मतदारांच्यात अँटिइनकमबन्सी तयार झाली आहे…याचा मोठा फटका हा पंकजा मुंडेंना मतदार संघात बसू शकतो…त्यात महाविकास आघाडीने लावलेले ताकद आणि शरद पवारांचा प्रचारातला सक्रिय सहभाग या सगळ्या गोष्टी बजरंग बाप्पांच्या पथ्यावर पडू शकतात.
पण अजितदादांनी लावलेली ताकद, भाजपचं स्ट्रॉंग केडर, मुंडे कुटुंबाचा एकदिलाने चाललेला प्रचार आणि बंजारा समाजाची पारंपारिक व्होटबँक हे सारं काही मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात प्लसमध्ये ठेवतं. त्यामुळे ऊसतोडी पासून ते पाण्यापर्यंतच्या अनेक मूलभूत प्रश्नांनी आजही पीडित असलेल्या बीडकरांचं जगणं सुसह्य करेल, असा परफेक्ट खासदार कोण असू शकतो…बजरंग बाप्पा सोनवणे की पंकजा मुंडे? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.