लॉकडाऊन स्पेशल | खमंग, खुसखुशीत – सातारी बाकरवडी

पोटासाठी सर्वकाही | बाकरवडी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रातील विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीच्या बाकरवड्या प्रसिद्ध आहेत. तिखट-गोड स्वरुपाचा हा पदार्थ एकदा खायला सुरुवात केली की संपेपर्यंत सोडायची इच्छाच होत नाही बघा. पश्चिम महाराष्ट्रातील चितळेंची बाकरवडी तुम्हाला राज्याबाहेरील विमानतळांवर, इतर दुकानांमध्येही पहायला मिळते. सातारकर मेघना देशमुख यांनीही अशीच सातारी पद्धतीची बाकरवडी खवय्यांसाठी बनवली आहे. त्यांनी बनवलेली खाऊनसुद्धा झाली बरं का..!! आता तुमची वेळ – बनवायची. चला तर मग, लागा तयारीला..

कणकेसाठी साहित्य :-
1 वाटी मैदा
2-3 चमचे बेसन
मीठ, हळद व चिमूटभर हिंग
2 मोठे चमचे तेल

सारणासाठी साहित्य :-
1 वाटी बारीक चिरलेले खोबरे
1 चमचा पांढरे तीळ
1 चमचा बडीशेप
1 चमचा खसखस
1 चमचा धने
1 चमचा जिरे
चिमूटभर मीठ, हिंग
1 चमचा लाल तिखट
1 चमचा पिठीसाखर

कृती (कणकेसाठी) :-
मैदा व बेसन एकत्र करा मीठ, हिंग व हळद घाला . 2 चमचे कडक तेलाचे मोहन घालुन ते एकजीव करून घ्या. 1 वाटी पाणी घालून घट्ट मळून घ्या. जास्त सैल करू नये. 20 मिनिट कणिक झाकून ठेवा.

सारणासाठी :-
सारणाचे सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये बारीक करा.(साहित्य भाजुन घेऊ नये नाहीतर ते तेलामध्ये जास्त करपते)

बाकरवडी करण्याची कृती :-
कणकेचे व सारणाचे समान भाग करून घ्या. कणकेची लांबट किंवा गोल आकाराची पोळी लाटून घ्या (पीठ लावू नये). पोळीवर चिंचेचा कोळ पसरून लावा. त्यावर सारणाचा 1 भाग पसारा ते पोळीला चिकटेल अशा पद्धतीने समान पसरून दाबून घ्या. आता पोळीच्या कडांना पाणी लावून त्या पोळीची सुरळी (रोल) बनवा.
1-1 इंचाच्या गोल वड्या कापून घ्या. या वड्या मध्यम आचेवर तळून घ्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

मेघना देशमुख या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांना पाककलेची, रांगोळीची आणि फॅशन क्षेत्राची विशेष आवड आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 8698163195

You might also like