बालाजी ज्वेलर्सवरील दरोडा उघडकीस : सातारा एलसीबीने घेतले गुजरातमधून तिघांना ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | खटाव तालुक्यातील मायणी येथील बालाजी ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) चार दिवसांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक एअर गन असा ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणात आकाश सुखदेव जगताप व मधुसूदन संदीपकुमार पारीक (दोघे रा. म्हसवड, ता. माण), अंकुश ऊर्फ दीपक संभाजी यादव (रा. बस्तवडे, ता. तासगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चार दिवसापूर्वी गुरूवार दि. 7 आॅक्टोबरला रात्री आठच्या सुमारास बालाजी ज्वेलर्समध्ये घुसून बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अमित प्रभाकर माने (रा. मायणी, ता. खटाव) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून एलसीबीचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. तपास पथकाने संशयितांच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पारंपरिक बातमीदार पद्धतीचा उपयोग करून संशयित आकाशची ओळख पटविली. तपासामध्ये तो अहमदाबाद (गुजरात) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला तेथे जाऊन अटक करण्यात आली. चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मधुसूदन व अंकुश यांना म्हसवड येथे पकडण्यात आले.

या वेळी घेतलेल्या झडतीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, एअर गन, जिवंत काडतूस असा ऐवज हस्तगत करण्यात आला. अधीक्षक बन्सल, अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे, निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक गणेश वाघ, सहायक फौजदार उत्तम दबडे, सुधीर बनकर, संतोष पवार, आतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, अनिल धुमाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, अमोल माने, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, प्रवीण पवार, वैभव सावंत, केतन शिंदे, संकेत निकम, विक्रम पिसाळ, गणेश कचरे हे सहभागी होते.

Leave a Comment