कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार बाळासाहेब पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु ॥ पुणे या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे संचालक सुरेशराव माने (रा. चरेगाव) यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कामकाज सुरू असून, राज्यातील साखर उद्योगाला या संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी व सहकारी साखर कारखाने यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून नवनवीन ऊसांच्या जाती तयार करण्यासंबंधी संशोधन केले जाते. तसेच हेक्टरी उत्पादन वाढविणे, उस शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करणे, पाणी व खतांचा योग्य वापर, उस तोडणी कार्यक्रम आदि बाबत शेतकरी व साखर कारखान्यांना मार्गदर्शन केले जाते.
यापूर्वी नामदार बाळासाहेब पाटील यांची 2002 आणि 2007 साली सलग दोन वेळा व्ही. एस. आय. च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली होती. तिसऱ्यांदा झालेल्या निवडीबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन लक्ष्मी गायकवाड, संचालक सर्वश्री मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील, दत्तात्रय जाधव, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, संजय थोरात, अविनाश माने, रामचंद्र पाटील, बजरंग पवार, पांडुरंग चव्हाण, सर्जेराव खंडाईत, लहूराज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, संचालिका शारदा पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील व अधिकारी उपस्थित होते.