अशा प्रकारच्या भूमिका भाजपसाठी अनुकूल; ममतांच्या टिकेनंतर बाळासाहेब थोरातांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रत्युत्तर देत काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे असे म्हंटल आहे.

भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.

राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेसने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुलजी आणि गांधी कुटुंबियांवर या दरम्यान भाजप व इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुलजी मागे हटले नाहीत.

राहुलजी गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करून भाजपविरोधातील लढाई लढता येणार नाही, उलट अशी भूमिका भाजपसाठी अनुकूल ठरणार आहे.

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी? 

भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, “काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला होता.

You might also like