कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे सकस आहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून क्रुत्रिम दुध तयार केले जात आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात युरिया, पामतेल, मेलामाईन यासारखे विषारी रसायन मिसळले जात असल्याचा प्रकार घडत आहे. याविरोधात बळीराजा शेतकरी सन्घटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे.
दुधात भेसळ करणाऱ्या दूध संघातील पांढऱ्या बोक्यांवर अन्न भेसळ विभागाने कारवाई करावी, अन्यथा सातारा येथील अन्न भेसळ कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू, असा इशारा आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा येथील अन्न भेसळ विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, युवा जिल्हाध्यक्ष सुशांत गोळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, किरण गोडसे, सागर शेळके व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, राज्य सरकारने कायद्यामध्ये बदल करून प्रशासन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात दुध भेसळ व अन्न भेसळ झाली असेल तर त्याची जबाबदारी अन्न भेसळ अधिकाऱ्यांवर निश्र्चित केली पाहिजे. तसा राज्य सरकारने कायदा करून घ्यावा. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल. दुधात मोठ्या प्रमाणावर विषारी पदार्थ मिसळून दररोज लाखों रुपये मिळविणारी आपल्या सातारा जिल्ह्यात अशा पांढऱ्या बोक्यांची टोळीच माजली असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन घेतात. परंतू सातारा जिल्ह्यात खासगी दुध संस्था दुध प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे गोरगरिबांचे पुर्णान्न असलेल्या दुधाच्या गुणवत्तेवर आणि विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यात दररोज लाखो लीटर दुधाचे संकलन होत असताना गेल्या काही वर्षात अन्न भेसळ विभागाची अपवाद सोडला तर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे.




