हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी गणेशोत्सव 2025 साठी पर्यावरणपूरक नियमांची घोषणा केली आहे. महापालिकेच्या नव्या परिपत्रकानुसार, सार्वजनिक गणेशोत्सवात पीओपीच्या (POP) मूर्तींवर पूर्णत: बंदी राहणार आहे. माघी गणेशोत्सवात (Maghi Ganeshotsav) उद्भवलेल्या विसर्जनाच्या वादानंतर महापालिकेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ही मोठी अडचण ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इथून पुढे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, या निर्णयानंतर गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार आणि राजकीय नेते यांची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नविन नियम काय असतील?
बीएमसीने जारी केलेल्या नियमावलीनुसार, मूर्तिकारांनी पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात यासाठी त्यांना मोफत मंडप परवानगी दिली जाईल. तसेच, सार्वजनिक आणि खाजगी मंडपांसाठी अर्ज करताना गतवर्षीच्या परवानगीच्या प्रती जोडणे बंधनकारक असेल. रस्त्यांवर आणि फूटपाथवर खड्डे खोदून मंडप उभारणे पूर्णत: प्रतिबंधित असेल. तसेच, नियमांचे उल्लंघन केल्यास 2,000 रुपये प्रति खड्डा दंड आकारला जाणार आहे.
त्याचबरोबर, सार्वजनिक मंडपांच्या प्रवेशद्वारांवर “येथे केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या जातात” असा फलक लावणे बंधनकारक असेल. याव्यतिरिक्त, गणेश मूर्तींच्या उंचीबाबतही काही मर्यादा घालण्यात येण्याची शक्यता आहे. जेणेकरून मूर्ती स्थिर राहील आणि विसर्जनाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. या निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या विषयावर शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे पालिकेचा हा निर्णय कायम राहणार की यात काही बदल केला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, यंदा माघी गणेशोत्सवात झालेल्या वादामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर न्यायालयाच्या आदेशांचे सावट राहणार आहे.