हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आहे. या भागातील बरेच अन्नपदार्थ हे केळीच्या पानात शिजवलेदेखील जातात. त्यामुळे दक्षिण भारतात केळीचं पान त्यांच्या परंपरेचा एक भाग झालं आहे. हि परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे तशीच आहे. दक्षिणी भागात पाहुण्यांना केळीच्या पानाच्या वरील भागावर जेवण वाढण्याची पद्धत आहे. तर केळीच्या पानाचा खालचा भाग म्हणजे देठाकडचा भाग हा घरच्या लोकांसाठी ठेवण्याची एक खास परंपरा आहे. इथे केळीच्या पानातच सगळ्या प्रकारचे पदार्थ वाढले जातात. हजारो वर्षांपासून हि परंपरा अशीच जतन करण्यात आली आहे. विशेष सांगायचे म्हणजे केळीच्या पानावर जेवण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे ‘आयुर्वेदात’ म्हटले गेले आहे.
आपला देश हा विविध गोष्टीनी संपन्न आहे. त्यापैकी एक म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदात अनेक औषधी पाला आणि वेलींचा उल्लेख, महत्व आणि वापर सांगण्यात आला आहे. यात केळीच्या पानावर जेवण्याचे देखील आरोग्यदायी फायदे असल्याचे म्हटले आहे. कारण केळीचे पान हे खनिज समृद्ध असते. शिवाय आयुर्वेदातील अभ्यासानुसार, केळ्यामध्ये प्लॅन्ट बेस्ड कंपाऊंड जास्त असतात. तसेच केळीच्या पानात पॉलीफेनॉल्स, एपिगॅलोकेटॅचिन गॅलेट वा ईजीसीजी म्हणून ओळखले जाणारे घटक आढळतात. यापासून नैसर्गिक अॅन्टीऑक्सिडन्ट मिळतात. ज्याचा रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोठा फायदा आहे. चला तर केळीच्या पानात जेवण्याचे अधिक फायदे जाणून घेऊयात:-
केळीच्या पानातील अँटीऑक्सीडेंट पोटात गेल्याने फ्री रॅडिकल्स कमी होतात आणि आजारपण येत नाही. दरम्यान केळ्याचं पान आपल्याला खाणे शक्य नसते. मात्र त्यावर गरम जेवण जेवल्याने पानातील पौष्टिक घटक आपल्या पोटात जातात आणि त्याचा लाभ मिळतो.
याशिवाय केळ्याच्या पानात आढळणारे अॅन्टी बॅक्टेरियल घटक हे जेवणातील किटाणू देखील मारतात. त्यामुळे जेवणातून बॅक्टेरिया पोटात जाण्याची संभाव्यता कमी होऊन आजारपणाची शक्यता कमी होते.
अनेक लोक सोहळ्यासाठी, घरातील कार्यक्रमांसाठी डिस्पोजेबल डिशचा वापर करतात. या डिश प्लॅस्टिक आणि स्टायरोफोमपासून बनलेल्या असतात. ज्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. याउलट, केळ्याचे पान हे पर्यावरण पूरक असते. केळीच्या पानाचं विघटन हे प्लॅस्टिकपेक्षा वेगाने होते. शिवाय तज्ञ सांगतात कि, केळीच्या पानावर एक मेणासारखा पापुद्रा असतो. जो अतिशय सूक्ष्म असतो. पानावर गरम जेवण वाढल्यानंतर हा पापुद्रा वितळून जेवणाला अधिक रुचकर बनवतो.
अनेकदा घाईगडबडीत भांडी घासल्याने ताटांना साबण राहिल्याचे आपण पाहिले असेल. अशा अस्वच्छ ताटात जेवल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. कारण साबणामधील काही रसायनिक घटक हे आपल्या शरीरावर परिणाम करू शकतात. याउलट, केळीची पानं स्वच्छ धुवून त्यावर जेवल्याने केमिकल फ्री आहाराचे सेवन करता येते.
केळीच्या पानावर जेवण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा असा कि, आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहते. शिवाय त्वचा रोग होत नाही. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यांसारखे त्रास होत नाहीत.