Bank Of India च्या ग्राहकांना झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्त्वाची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. याचे कारण म्हणजे बँकेने आपल्या बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. BOI ने बचत खात्यावरील व्याजदरात 0.15 टक्के कपात केली आहे. मात्र ही कपात 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात करण्यात केली आहे, तर बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. बँकेचे नवीन दर 1 मे 2022 पासून लागू झाले आहेत.

बचत खात्यावरील व्याजदरात 0.15 टक्के कपात

जर एखाद्या बचत खातेधारकाच्या बँक खात्यात 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असेल तर त्याला आता केवळ 2.75 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्याच वेळी, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असल्यास 2.90 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असल्यास व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. १ लाखापेक्षा जास्त शिल्लक असलेल्या व्याजदरात कोणतीही कपात नाही.

बँक ऑफ इंडियाचे नवीन FD दर
बँक आता 7 ते 45 दिवसांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर 2.85 टक्के व्याजदर देईल. तर 46 दिवस ते 90 दिवस आणि 91 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.85 टक्के व्याज देईल. 180 दिवसांपासून ते 269 दिवस आणि 270 दिवसांपर्यंत एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता बँक ऑफ इंडियाकडून 4.35 टक्के व्याज मिळेल.

1 वर्ष आणि त्याहून अधिक मुदतीच्या परंतु 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या रुपयाच्या FD वरील व्याज दर 5.00 टक्के असेल, तर 2 वर्षे आणि त्याहून अधिक परंतु 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी व्याज दर 5.20 टक्के असेल.