बंदूक घेऊन बँकेत आले, फायर केली..तरी कर्मचार्‍यांनी पैसे चोरट्यांना दिले नाहीत (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा जवळील चोंढी आंबा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक तीन चोरट्यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता लुटण्याचा प्रयत्न केला. पंरतु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद दिली नसल्याने चोरट्यांनी पलायन केले. यावेळी चोरट्यांनी बँकेच्या काचेवर दोन राऊंड फायर केले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. काच फुटल्याने रोखपाल जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढीआंबा येथील टी पाँईटवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे . शुक्रवारी दररोजचा व्यवहार आटोपून बँकेचे अधिकारी इशान खिस्ते , रोखपाल नितीन ननवरे व सेवक भद्रदीप सरोदे हे काम करीत होते.

बंदूक घेऊन बँकेत आले, फायर केली..तरी कर्मचार्‍यांनी चोरट्यांना भीक घातली नाही; पहा थरार

दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून तिघे जण बँके समोर आले. त्यापैकी दोघे जण बँकेत शिरले तर एक जण बँकेबाहेरच थांबला. यावेळी बँकेत गेलेल्या दोघांनी हातातील बंदूक दाखवून इशान खिस्ते यांना धमकावून बँकेत काय आहे ते देण्याबाबत दरडावले.

मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद न दिल्याने चोरट्यांनी बँकेतून काढता पाय घेतला. बँकेतून जातांना चोरट्यांनी दोन राऊंड फायर केले. राऊंड चॅनल गेटला लागल्यामुळे कुठलीही हाणी झाली नाही. पंरतु बँकेची काच फुटून लागल्याने रोखपाल ननवरे जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख , उपाधिक्षक किशोर कांबळे कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी बँकेतील माहिती घेण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment