औरंगाबाद | महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच शहरात कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून 26 भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. आता या भागाच्या प्रत्येक एन्ट्री पॉइंटवर बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इतर भागातील व्यक्तींसाठी कन्टेनमेंट झोनमध्ये जाण्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
औरंगाबाद शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आणखी गतीने पसरू लागला आहे. या अनुषंगाने नुकतीच केंद्रीय पथकाने शहरात पाहणी केल्यानंतर येथील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यात संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कंन्टेनमेंट झोन जाहीर करून उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. दरम्यान पालिकेने 19 वॉर्ड रेड म्हणून जाहीर केले होते. मात्र कंन्टेनमेंट झोनची यादी अंतिम करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीच्या पथकावर सोपवली होती.
स्मार्ट सिटीच्या पथकाने आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून 26 भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. त्यात सहा मायक्रो, 12 मिडीयम तर आठ लार्ज कंन्टेनमेंट झोनचा समावेश आहे. कन्टेनमेंट झोन जाहीर झाले असले तरी या भागात अद्याप नागरिकांना वावर सुरू आहे. त्यामुळे या भागाच्या प्रवेशव्दारावर कन्टेनमेंट झोन संदर्भात बॅनर्स लावण्यात आले आहेत. तसेच या भागात इतर भागातील नागरिकांना जाण्यापासून रोखले जाणार असल्याचे ही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.