औरंगाबाद | कोरोनानंतर म्युकर मायकोसिस या रोगाने औरंगाबाद जिल्ह्यात डोके वर काढले होते. या आजाराने ग्रासलेले अनेक रुग्ण ही जिल्ह्यात आढळत आहेत. आजही राज्यात सुमारे अठराशे रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात सध्या म्युकर मायकोसिस 229 रुग्ण उपचार घेत आहेत.
म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना झालेल्या आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यासारखे आजार असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. शिवाय प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांनाही हा आजार झाल्याचे दिसून आले आहे. म्युकर मायकोसिसचा संसर्ग झाल्याचे निदान उशिरा झालेल्या रुग्णांवर डोळा, जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. संसर्ग वाढल्याने हजारो रुग्णांना जीवही गमवावा लागला आहे.
राज्यामध्ये 25 ऑगस्टपर्यंत म्युकर मायकोसिस आजाराचे 10 हजारावर रुग्ण आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1536 रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुणे असून, या जिल्ह्यात 1351 रुग्ण तर औरंगाबाद जिल्ह्यात 1118 रुग्ण तर मुंबईत 918 रुग्णालये आहेत. नाशिक व सोलापूरमध्ये 650 ते 760 दरम्यान रुग्ण आढळले आहेत. राज्यात आढळलेल्या 10 हजार 20 रुग्णांपैकी 6746 रुग्ण उपचार आंती बरे झाले असून, 1317 रुग्णांनी जीव गमावला आहे सध्या 1768 रुग्णावर उपचार सुरू आहेत.