औरंगाबाद – शहरात ऐन सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खवा तसेच बर्फी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बायजीपुरा, संजयनगर भागात भेसळयुक्त, हानिकारक मिठाई विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा, अन्न व औषधी विभागाने संयुक्तरीत्या कारवाई करत तब्बल 281 किलो खवा व 68 किलो बर्फी जप्त केली. तसेच जप्त केलेली मिठाई फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.
संजयनगर, बायजीपुरा परिसरातील गल्ली क्रमांक बारामध्ये भेसळयुक्त खवा व मिठाई विक्री होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यांच्या सोबत औषधी विभागाच्या अधिकारी रोडे यांच्यासह म्हस्के, सहायक फौजदार सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, रवींद्र खरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे, मोहिनी चिंचोळकर यांनी छापा टाकला.
छाप्यामध्ये व्यावसायिकाकडून सर्व ऐवज जप्त करत त्यातील नमुने अहवालासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. अहवालात भेसळ व त्याचे प्रमाण स्पष्ट झाल्यानंतर संबंधित व्यावसायिकावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच नागरिकांनी मिठाई खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




