औरंगाबाद : दुचाकीस्वार निघालेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला दोघांनी रस्त्यात अडवून लुटले. हा प्रकार ८ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास खोकडपुऱ्यातील बीएसएनएल कार्यालयाच्या जवळ घडला. चोरांनी त्यांना मारहाण करत खिशातून बळजबरीने मोबाईल व रोख ३ हजार ६०० रुपये हिसकावून पोबारा केला. शेख मुनीर शेख अमीर (६०, रा. कटकटगेट रोड, अरीश मस्जीद जवळ) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शेख मुनिर हे त्यांच्या दुचाकीने (एमएच- २०-एफटी-७०२१) सिल्लेखाना मार्गे बीएसएनएल कार्यालयाच्या दिशेने जात होते. कार्यालयाच्या मागच्या गेटजवळ येताच त्यांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी थांबवले. शेख यांच्या खिशातुन बळजबरीने मोबाईल काढुन घेतला. तर एकाने पैसे कुठे आहेत असे म्हणत शेख यांच्या कपाळावर फायटरने मारुन जखमी केले. तसेच पँन्टच्या पाठीमागील खिशातुन पॉकेट काढुन घेत तेथून धूम ठोकली. याप्रकारानंतर शेख यांनी शुक्रवारी सकाळी सडे अकराच्या सुमारास क्रांती चौक पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे करत आहेत.
अलीकडच्या काळात शहरात सौभाग्यच लेन समजलं जाणाऱ्या मंगळसूत्रावर चोरट्यांची वक्र दृष्टी पडली आहे. अलगद महिलांचे मंगळसूत्र चोरीचे प्रकरण वाढत आहे.त्यांनाच पकडण्यात पोलिसांना अजून यश मिळालेले नाही अशातच आता माजी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करत लुटण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.