सातारा | सातारा नगरपालिकेच्या माजी महिला उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे यांना भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या प्रकाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारानंतर जांभळे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, साताऱ्यातील कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी बुधवारी सकाळी रांगोळी काढत होत्या. यावेळी एका माजी उपनगराध्यक्षांचे पती घटनास्थळी आले. त्यांनी रांगोळी का काढत आहात, स्वच्छतेचे काम करा असे महिला कर्मचाऱ्यांना सांगितले.
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांचा पारा चढला आणि त्यांनी अरेरावी सुरू केली. काही वेळात संबंधित माजी महिला उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र जांभळे यांनी अरेरावी सुरूच ठेवली. यानंतर त्यांनी दमदाटी करत मारहाण केली, असा आरोप माजी महिला उपनगराध्यक्षांनी केला आहे. या घटनेनंतर संबंधित दिपाली गोडसे दांपत्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन धनंजय जांभळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
दिपाली गोडसे म्हणाल्या, कला- वाणिज्य चाैकात काहीतरी दंगा चाललेला. यावेळी मी तेथे गेले तेव्हा स्वच्छता कर्मचारी रांगोळी काढण्याचे काम करत होते. तेव्हा माझे पती राजू गोडसे हे धनंजय जांभळे यांना म्हणाले, कर्मचारी साफसफाईचे काम सोडून रांगोळी का काढत आहेत. तेव्हा भांडणे सुरू होणार होते, म्हणून नुसते थांबा म्हणाले. तोपर्यंत भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांना मारहाण केली. यावेळी माझ्या अंगावर दगड घेवून मला मारण्याची भाषा त्यांनी केली.