आंबेगाव ते माजलगाव…. बीड जिल्ह्यात विधानसभेला नेमकं काय होतंय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाप्पा.. बाप्पा कामच झालं ना.. टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे लोकसभेला शिकायला मिळालं ते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून… मातब्बर पंकजा मुंडे आणि भाजपची मोठी ताकद पाठिशी असतानाही बजरंग बाप्पा अटीतटीच्या लढतीत जायंट किलर ठरले.. तुतारी वाजवत खासदार झाले… पण इथं निवडणुकीच्या निम्मिताने पाहायला मिळाला तो टोकाचा जातीयवाद. मराठा विरुद्ध ओबिसी संघर्षाची झळ ज्या काही राजकारण्यांना बसली त्यात आता बीडमधील पंकजा मुंडेच्या पराभवाचाही करावा लागेल… विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतसा हा मराठा विरुद्ध ओबिसी समाजातील विस्तव आणखीनच वाढत चालल्याचं आपण पाहत आहोतच. पण जातीय अस्मिता टोकदार झाल्यानं माजलगाव, केज, परळी, आष्टी यांसारख्या हॉटस्पॉट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा निकाल नेंमका कसा लागेल? जिल्ह्यातल्या सहा विद्यमान आमदारांना यंदाही गुलाल लागणार का? की कोणते नवे चेहरे या आमदारकीच्या रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतील? त्याचंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…

पहिला येतो तो बीड विधानसभा…

२०१९ ला काका विरुद्ध पुतण्या म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर या लढतीत काकाला पाणी पाजून संदीप क्षीरसागर घड्याळाच्या चिन्हावर आमदार झाले… पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांशी एकनिष्ठ राहत त्यांनी खासदारकीला मुंडे कुटूंबाला चॅलेंजही दिलं.. बजरंग बाप्पांच्या पाठिशी संदीपभैयांचीच यंत्रणा लागल्यानं बीडातून तुतारी वाजली…त्यामुळे विधानसभेसाठी संदीप क्षीरसागरांची आमदारकी यंदा आणखीनच फिक्स समजली जातेय. तसं बघायला गेलं तर बीड मतदारसंघावर क्षीरसागर घराण्याचं एकहाती वर्चस्व राहिलंय… साखर कारखाने, शिक्षण आणि सहकारी संस्थाच्या जोरावर क्षीरसागर कुटूंबानं राजकारणवर आपला दबदबा ठेवला… बीड विधानसभा, मागील २५ वर्षापासून, क्षीरसागर कुटुंबाकडेच राहिलीय.. त्यात संदीप क्षीरसागरांना मतदारसंघातून कडवा विरोधकच राहीला नसल्याने यंदाही संदीप क्षीरसागरच आमदार होतील, असं बोललं जातंय…

YouTube video player

दुसरा मतदारसंघ आहे केज विधानसभा…

मुंदडा कुटूंबाचा हा पारंपारिक बालेकिल्ला… 1990 पासून विमल मुंदडा दोन वेळा भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादीकडून असा सलग पाच वेळा केजच्या आमदार राहिल्या. 2012 साली मुदंडा यांचं दीर्घकालीन आजारानं निधन झालं त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे निवडून आले…2014 च्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आला… भाजपच्या प्रा. संगिता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता मुंदडा यांच्या विरोधात मोठं लीड घेत निवडणूक जिंकली…मात्र 2019 मध्ये इथे मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी भाजपात जात कमळाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरल्या… त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवलं… या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेर मुंदडा आमदार झाल्या… पण 2024 उजाडताना वातावरण बरच फिरलय… केजमध्ये, मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्वाला धक्के बसतायत.. केज नगरपालिका, त्यांच्या ताब्यात नसून लोकसभा निवडणुकीतही तब्बल 20 हजारांचं लीड बजरंग बाप्पांनी घेतलंय…याच्याच जीवावर ते सध्या खासदार झालेत… जनतेमधील कमी झालेला संपर्क, विकासाची न झालेली काम, यामुळे नमिता मुंदडा, यांना यावेळी निवडणूक सोपी असणार नाही. त्यात पवारांच्या सहानुभूतीवर पृथ्वीराज साठे हे आमदारकीचं मैदान मारतील, अशी सध्या केजची परिस्थिती आहे..

तिसरा मतदार संघ आहे गेवराईचा…

भाजपचे लक्ष्मण पवार गेवराई मतदार संघातून सलग दोन टर्मचे आमदार राहिले आहेत… राष्ट्रवादीनं इथून दोन्ही वेळेला विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली.. पण दोन्ही निवडणुकीत पंडितांचा पराभव झाला… 2014 ला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती तर 2019 ला मोदी लाटेमुळे लक्ष्मण पवार यांचा विजय सोपा झाला.. प्रत्येक वेळेस पंकजा मुंडेंनी लक्ष घातल्याने पवार इथून आरामात निवडून आले… पण याच भाजपच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीला बजरंग बाप्पांना निसटती का होईना लीड मिळाल्याने या मतदारसंघातली पवारांची आमदारकी धोक्यात आली आहे… थोडक्यात येणाऱ्या विधानसभेला गेवराईत पवार विरुद्ध पंडीत यांच्यात तुंबळ संघर्ष पहायला मिळणार आहे…

पुढचा आहे तो माजलगाव विधानसभेचा…

माजलगाव विधानसभा 2014 च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आर. टी. देशमुख यांनी राष्ट्रवादीचे निकटचे प्रतिस्पर्धी, प्रकाश सोळंके दादा, यांना 37,145 मतांनी पराभूत केलं होतं.. नंतर २०१९ मध्ये सोळुंके यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला.. पण नंतर राष्ट्रवादीच्या फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं रमेश आडसकर आणि प्रकाश सोळुंके हे दोघेही विरोधक महायुतीचे भाग झालेत… या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक आमदार म्हणून निवडून येण्याचा मान प्रकाश सोळंके यांना मिळतो. साखर कारखानांचं राजकारण इथल्या विधानसभेला निर्णायक ठरत आलंय.. मात्र मराठा समाजाचा असलेला रोष, व मनोज जरांगे फॅक्टर, यामुळे प्रकाश सोळुंके यांची विधानसभेची वाट सध्यातरी बिकट दिसतेय.. मात्र रमेश आडसकर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.. त्यामुळे त्यांनी जर का तुतारी हातात घेतली तर तुतारी चिन्हावर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो..

आता येतो तो हायव्होल्टेज परळी विधानसभा मतदारसंघ…

परळी आणि मुंडे हे न तुटणारं नातं. इथं चालतं ते फक्त आणि फक्त मुंडे घराण्याचं.. बीड हा जिल्हा जरी असला तरी त्याचं सेंटर पॉइंट हा परळीच राहीला आणि त्याला कारण ठरलं ते मुंडे कुटुंब. २००९ ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघाची आमदारकी पटकावली. पुढे २०१४ ला बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव करत त्यांनी परळी आपलीच हे ठासून सांगितलं.. या टर्ममध्ये गोपिनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पंकजा मुंडेंची मंत्रीपदावर वर्णी लागली. पण चिक्की घोटाळ्यामुळे मंत्रीपद सोडण्याची नामुष्की ओढवल्यापासून पंकजाताईंचा डाऊन फॉल सुरु झाला तो काही थांबायचं नाव घेत नाहीये… यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभेला धनुभाऊ जायंट किलर ठरले आणि पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. पुढे अनेक संधीतून डावलण्यात आल्यानंतर त्यांच्यासाठी शेवटची संधी चालून आली ती लोकसभेची… पण तिथेही बजरंग बाप्पा यांनी गुलाल उधळल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकारण आणखीनच किचकट होऊन बसलंय. कारण येणाऱ्या विधानसभेला आपण लढणार नसल्याचं सांगून महायुतीकडून ही जागा धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडल्यात जमा आहे.. धनजंय मुंडे यांचं परळीतील पारडं जड असलं तरी शरद पवारांनी फिल्डींग लावली तर विधानसभेचा निकालही फिरु शकतो.. सध्या महाविकास आघाडीकडून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूकीसाठी तयारी करतायत.. तर बबन गित्ते यांच्याही नावाची इथं अधूनमधून चर्चा होतेय. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्यपाठोपाठ धनंजय मुंडे यांना खिंडीत गाठण्यासाठी आघाडी काय फिल्डींग लावतेय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…

आता पाहुयात, शेवटच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्धल..

आष्टी हा एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री सुरेश धस यांचा बालेकिल्ला.. धस आता भाजपचे विधानपरिषदेतील सदस्य असून बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते इथले विद्यमान आमदार आहेत… लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तीस हजार मतांची आघाडी आष्टी विधानसभेनं मिळवून दिलीय… त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला इथून जिंकण्याचे जास्त चान्सेस असले तरी तिकीट कुणाला मिळतंय, यावर इथलं गणित अवलंबून असणार आहे… विद्यमान आमदारांनाच तिकीट वाटप करण्याचा फॉर्मुला ठरला तर आजबे यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी धस हे ऐनवेळी शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात.. मात्र सध्यातरी आजबे या मतदारसंघात प्लसमध्ये आहेत… तर अशी आहे बीड जिल्ह्यातील विधानसभेची राजकीय परिस्थिती… त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही भाजपचा गड उध्वस्त करायला महायुतीला यश येतंय का? परळी आणि माजलगाव सारख्या अटीतटीच्या मतदारसंघात आमदार कोण होतंय.. तुमचा अंदाज काय सांगतोय ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..