युतीची घोषणा होण्याआधीच चंद्रकांत पाटलांनी केली चार उमेदवारांच्या नावाची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना भाजपने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करून टाकली आहे. युती होवो अथवा न होवो वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदार संघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरमधून मनोज घोरपडे हे भाजपचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

विजय बुथ संमेलनाच्या निमित्ताने सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाजपा उमेदवारांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना पाटील यांनी उमेदवारांना दिल्या. कुठल्याही परिस्थितीत भाजप-सेना युती होणारच असे वाई येथे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. भाजपा आणि शिवसेनेतील काही जागांची अदलाबदलीचा विषय आहे. तो समन्वयातून सोडवू”, असे
पाटील यांनी सांगितले होते. काँग्रेस राष्ट्रवादीकडे निवडणुकीत उभे राहायला लोक दिसणार नसल्याचे सांगताना पाटील म्हणाले होते महाराष्ट्रात मजबूत भाजप सरकार आणण्यासाठी येत्या वीस दिवसात विक्रमी काम करणार आहोत. ‘अबकी बार २८८ पार’ अशी घोषणाही त्यांनी केली होती.

आगामी विधानसभेसाठी शिवसेना-भाजपात युतीची चर्चा सुरू आहे. सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघासह अनेक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यात पाटील यांनी परस्पर मदन भोसले, अतुल भोसले, महेश शिंदे, मनोज घोरपडे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

फलटण मतदारसंघातून नव्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मर्जीतील अथवा विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर ही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने येथेही भाजपाचा उमेदवार असेल हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आठ पैकी सात जागांवर भाजपाकडून तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे आणि फलटणलाही भाजपा उमेदवारी देणार हे निश्चित आहे.

Leave a Comment