कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे यांच्यावतीने साखर क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल दिले जाणारे २०२१-२२ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत, यामध्ये यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास दक्षिण विभागाचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन मा. आमदार बाळासाहेब पाटील व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात जात निहाय- हंगाम निहाय ऊस लागवड व तोडणी कार्यक्रम राबवित आहे. राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणार्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार, सर्व ऊस उत्पादक सभासदांच्या सहकार्याने ऊस तोडणी कार्यक्रम राबवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. ऊस नोंदणी, तोडणी व वाहतूक आदि नियोजन मोबाईल ॲपद्वारे केले जाते. ऊस तोडणी, ऊसाचे वजन, ऊस बिले व तोडणी वाहतूकीची बिले आदिंचा मेसेज ऊस उत्पादक सभासद व तोडणी वाहतूक कंत्राटदारांना तात्काळ पाठविला जातो. कारखाना कार्यक्षेत्रातील कारखान्याने राबविलेल्या ऊस विकास कार्यक्रमात ऊस उत्पादक सभासदांना हिरवळीची खते, पायाभूत व प्रमाणित बियाणे, कंपोस्ट खते, द्रवरूप खतांमध्ये वसंतउर्जा, मायक्रो न्युट्रीयंट, हुमणी किड नियंत्रक इ. कृषी निविष्ठांचा पुरवठा व त्यासाठी अनुदान योजना राबवली जाते. शेतकरी व कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणे आणि अभ्यासदौऱ्यांचे नियोजन केले जाते, ऊस पिकांसाठी ठिबक सिंचन योजनेची कार्यक्षेत्रात अंमलबजावणी करून केली जाते, मोफत माती आणि पाणी परिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी कारखाना कार्यस्थळावर केली जाते, यामुळे कारखान्याच्या सन 2020-21 हंगामात हेक्टरी सरासरी 117 मे.टन ऊस उत्पादन तर 2021-22 हंगामात हेक्टरी सरासरी 120 मे.टन ऊस उत्पादन झाले, ते राज्यामध्ये वरच्या क्रमांकाचे आहे. ऊस शेतीमध्ये लागवड व तोडणी याकरिता यांत्रिकीकरणावर भर दिला जातो.
या उत्तम कामगिरीबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन 2021-22 गळीत हंगामासाठी दक्षिण विभागातून, उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा पुरस्कार जाहीर केला आहे. सन 2021-22 सालाच्या जाहिर झालेल्या पुरस्काराकरीता कारखान्याचे चेअरमन मा. आमदार बाळासाहेब पाटील व सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, ॲग्री ॲडव्हायझर मोहनराव पाटील, मुख्य शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, उप ऊस विकास अधिकारी संजय चव्हाण, उप शेती अधिकारी नितीन साळुंखे, व शेती विभागातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
यापूर्वी कारखान्याच्या शेती व ऊस विकास विभागाकरीता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांनी सन 1998-99 व 2013-14 या सालाकरीता उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार देवून, तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेने सन 1998-99 सालाकरीता प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार देवून कारखान्यास सन्मानित केलेले आहे. कारखान्यास जाहिर झालेल्या उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्काराबद्दल कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील व सर्व संचालक आणि सभासदांचे अभिनंदन होत आहे.