मुंबई । बेस्ट कामगारांना आरोग्य विमा कवच देण्यासह इतर मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. कोरोना संकटाच्या काळात बेस्ट कामगारांनी कामगार संघटनेला साथ देण्याऐवजी बेस्ट प्रशासनाला साथ दिली. ८० ते ९० टक्के कामगारांनी कामावर हजेरी लावल्याने बेस्टची वाहतूक सुरळीत सुरू होती.
बेस्ट कामगारांना विमा कवच देण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट संयुक्त कामगार कृती कर्मचारी समितीने आज आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे करोना संकटाच्या काळात या आंदोलनाचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे बेस्ट प्रशासनानेही पर्यायी व्यवस्था म्हणून एसटीकडून १ हजार बसेस चालवण्याची पर्यायी व्यवस्था केली होती. मात्र, आज १८०० बसेस नेहमीप्रमाणेच रस्त्यावरून धावले.
कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आजपासून बेस्ट बंद ठेवण्याचं आवाहन केलं खरं, पण नेत्यांचा आदेश झुगारून बेस्ट कर्मचारी आपल्या कर्तव्याला जागले. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठीच नेत्यांनी पुकारलेले आंदोलन उधळून लावले आणि आपण खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहोत हे दाखवून दिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”