कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
श्री मलंग गडाच्या बालेकिल्ल्यावर भगतसिंग यांना वंदन सह्याद्री खोऱ्यात गिर्यारोहणासाठी आव्हानात्मक मानला जाणारा श्री मलंग गडाचा बालेकिल्ला टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली सर करीत सातारच्या गिर्यारोहकांनी वीर भगतसिंग यांना वंदन करीत, अभिमानाने तिरंगा फडकावित “शहीद भगतसिंग अमर रहे”, “भारत माता की जय”,” वंदे मातरम” या घोषणा देत, औषध निर्मात्यांच्या कार्याला सलाम करीत केलेली ही मोहीम भारतीय कन्या यांना समर्पित केली.
या मोहिमेसाठी गिर्यारोहक राजगुरूनगर ( पुणे ) येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतीशिल्पा समोर नतमस्तक होऊन मार्गस्त झाले. या मोहीमेची सुरवात मलंगवाडी, ता.बदलापुर, जि.ठाणे येथून झाली. पाचपीर मार्गे पीरमाची गाठत पुढे खड्या चढाईच्या मार्गाने सोन माची येथे जाता येते. येथून उजव्या बाजूला खडक आणि डाव्या बाजूला दरी अश्या मार्गाने पुढे गेल्यावर खडकात कोरलेल्या पायऱ्यांच्या वाटेनं ७० फूट वर गेल्यावर हा मार्गच नाहीसा होतो.
या ठिकाणी १५ फूटी पोल क्रॉसिंगचा थरार अनुभवत मार्ग काढावा लागतो. ओल्या निसारड्या पोलवर पायांची मजबूत पकड करून रस्सीच्या आणि खडकाळ भिंतीच्या सहाय्याने तोल सांभाळत सावधानतेने एक एक पाऊल टाकावे लागते. पुढे पायरी मार्गाने वर गेल्यावर साखाळदंड मार्ग चिकाटीने हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून साखळीच्या सहाय्याने आरोहण करावे लागते. पुढे दोन्ही बाजूला दरी आणि छोट्या निसारड्या वाटेने मार्ग काढत राजवाडा आणि पाण्याचे टाके असलेला गड माथा गाठत गिर्यारोहकांनी मोठ्या उत्साहात तिरंगा फडकावित वीर भगतसिंग यांना मानवंदना दिली.
शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि काळजाचा थरकाप उडवणारा पोल क्रॉसिंग आणि साखाळदंड मार्ग, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे, धुक्यात हरवलेला परिसर, निसारड्या पायऱ्या आणि एका बाजुला खोल दरी, घनदाट जंगल अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.
अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या चेतन शिंदे, जाॅकी साळुंखे, सौरभ भगत, हर्षल पाटील, जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव आणि लोणंद येथील पूजा टाक, कमलसिंग क्षत्रिय तसेच राजगुरूनगरचे गिर्यारोहक डॉ. समीर भिसे, प्रमोद अहिरे, प्रदिप बारी, नाशिक येथील भारतीय महिला कबड्डी संघाच्या माजी प्रशिक्षक शैलजा जैन, तसेच मुंबई येथील डॉ. एकता राऊत, डॉ. अर्जुन सावंत, डॉ. राहुल जाधव या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित मोहीम फत्ते केली.