चित्रपटनगरी| सध्या चर्चेत असलेला “भाई: व्यक्ती की वल्ली” हा चित्रपट बघितला. ताज्या वादाच्या आणि वादंगाच्या पार्श्वभुमीवर या चित्रपटाबद्दल माझे मन साशंक झालेले होते. तरिही मला हा चित्रपट आवडला. पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, संगीत झकास वाटले. पुलंचा देव करायची गरज नाही. ते एक रसरशीत असे प्रतिभावंत व्यक्तीमत्व होते. सामान्य प्रेक्षक डोळ्यापुढे ठेऊन हा चित्रपट काढलेला आहे. त्यामुळे तो निव्वळ कलात्मक, दुर्बोध, अंधारातला वगैरे चित्रपट नाहीये. आणि तोच त्याचा महत्वाचा गुण आहे.
सर्वसामान्य प्रेक्षक वर्तमानपत्री समिक्षणं वाचून चित्रपट बघायला का जात नाहीत याचे उत्तर मिळाले. किंबहुना ज्या चित्रपटांची हे बुद्धीजिवी समिक्षक वाहवा करतात त्यांच्याकडे प्रेक्षक फिरकतच नाहीत. ते त्याच्याकडे नक्कीच पाठ फिरवतात. हलक्याफुलक्या, प्रसन्न करमणूकीशी या विद्वानांचे एवढे वाकडे का असते?
हा चित्रपट बघायला दहा हजार अपेक्षा ठेऊन जायचेच कशाला ना? मला तरी हे वादंग म्हणजे अमुक पाहिजे, तमूक पाहिजे होते टाईपच्या अपेक्षांचे गाठोडे वाटले. बदनामीचा आरोप वगैरे तर निव्वळ कांगावा आहे. या चित्रपटात बदनामीकारक असे काहीही नाही.
एकवेळ जगातल्या सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पुर्ण करणे शक्य आहे. पण एव्हरेस्टच्या उंचीच्या बुद्धीजिवी, विद्वान, पत्रकार, समिक्षक असलेल्या जागतिक किर्तीच्या पुणेकरांच्या अपेक्षांची पुर्तता करणे केवळ अशक्य आहे. यापुढे या विद्वानांचे वाचण्याच्या भानगडीत न पडलेले बरे. गड्या आपला सामान्य माणूसच बरा. “या असल्या विद्वानांचे” बोजड ओझे आपल्याला झेपणारे नाही.
चित्रपटातील कलावंत गणेश मतकरी, रत्नाकर मतकरी, महेश मांजरेकर, अजित परब, सागर देशमुख, इरावती हर्षे, शुभांगी दामले, हृषीकेश जोशी, प्रिया जामकर, सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे, दिप्ती लेले आणि सर्व टिमचे मन:पुर्वक अभिनंदन.
कोणतीही कलाकृती म्हटले की मतभेद हे आलेच. विद्वान पत्रकार, समीक्षक हे सारे व्यक्तीगत न घेता ही मते वस्तुनिष्ठपणे घेतील अशी आशा असल्याने माझी प्रांजळ मते मांडली. सादर मतभेद हेच पुणेकरांचे ठळक लक्षण किंबहुना पेटंट आहे.
प्रा.हरी नरके