भोपाळ : वृत्तसंस्था – दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आज इंदौर येथील सेशन्स कोर्टात अंतिम सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांच्यासह पलक नावाच्या महिलेला दोषी ठरवले आहे. या पलक नावाच्या महिलेने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले होते अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यानंतर कोर्टाने या तिन्ही आरोपींना दोषी ठरवून सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या तिन्ही आरोपींनी भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अटक केली होती. आरोपी पलकने भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडीओ बनवले होते. यानंतर ती भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांच्यासह मिळून भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करायची. तसेच तिने भय्यू महाराजांवर लग्नासाठी देखील दबाव टाकला होता. पण भय्यू महाराजांनी आयुषीसोबत लग्न केले होते. यानंतर आरोपी पलक पुराणिक, विनायक दुधाले आणि शरद देशमुख यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
या प्रकरणी इंदूरच्या सेशन्स कोर्टात जवळपास साडेतीन वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर आज कोर्टात सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांनी पैशांसाठी भय्यू महाराजांना मानिसिकरित्या त्रास दिल्याचे कोर्टात सिद्ध झाले. ज्या सेवकांवर भय्यू महाराजांचा विश्वास होता, ज्यांच्यावर आपल्या आश्रम, कुटुंबाची जबाबदारी सोपवली होती त्याच सेवकांनी भय्यू महाराजांचा विश्वासघात केला होता. याप्रकरणी 19 जानेवारी रोजी सुमारे साडेपाच तास सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. यानंतर अखेर आज या प्रकरणातील आरोपींना सहा वर्ष कारवासाची दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली.